3 sisters married one man in UP : उत्तर प्रदेशातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. तीन बहिणींनी एकाच तरुणासोबत मंदिरात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या तरुणाचं नाव विकास उर्फ विक्कू आहे. त्याने देविका, छवी आणि अलका या तिघींसोबत एकाच मंडपात लग्न केलं.
एक नवरदेव आणि तीन नवरी त्याही बहिणी...
विकास उर्फ विक्कूने देविका, छवी आणि अलका या तीन बहिणींशी लग्न केलं. चौघेही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स आहेत. या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विकाससोबत या तरुणी सोशल मीडियासाठी लग्नाचे व्हिडीओ करायच्या. तिघींच्या घरच्यांनी वेगवेगळ्या घरात लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. विकास आणि तिघींनी मिळून चर्चा केली आणि लग्नाचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील अमरोहातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
३ बहिणींनी एकाच तरुणाशी का केलं लग्न?
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन सख्ख्या बहिणी आणि एक मावस बहिण आपल्या कथित पतीसोबत दिसत आहे. तिन्ही बहिणी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सक्रिय आहेत. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये त्यांनी लग्नाचं कारणही सांगितलं. या बहिणी लहानपणापासून एकत्र राहतात. त्यांचा दिवस एकत्र सुरू होतो आणि संपतोही एकत्र. बहिणींचा एकमेकांवर प्रचंड जीव आहे. व्हिडिओतील एका बहिणीने सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी आम्हा तिन्ही बहिणींचं लग्न एकाच कुटुंबात देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आम्हाला एकाच घरात तीन लग्नाळू मुलं असलेलं स्थळ मिळालं नाही. आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आम्ही एकमेकींशिवाय राहू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही खूप विचार केला आणि एकाच तरुणासोबत लग्न करण्याचं ठरवलं. शेवटी विकासने या तिघींचं एकमेकींवरील प्रेम पाहून तिघींशी एकत्रित लग्न करण्यास होकार दिला. विकास तिघींना प्रेम कसं देऊ शकतो अशा प्रश्नावर तो म्हणाला, त्या तिघीच एकमेकींवर इतकं प्रेम करतात, त्यांना माझ्या प्रेमाची गरज नाही. मी फक्त एक माध्यम आहे, ज्यामुळे या तिघी कायम एकत्र राहू शकतील. १५ जुलै रोजी चामुंडा मंदिरात नातेवाईकांशिवाय हे अनोखं लग्न संपन्न झालं.
नक्की वाचा - पत्नीशी वाद, काकीशी जवळीक; अवघ्या 24 तासात खळबळजनक हत्याकांडाचा मोठा खुलासा
सोशल मीडियावर ही अनोखी कहाणी ट्रेंड होत आहे. तर काहींनी याला विरोधही केला आहे. काहींनी हे कृत्य सनातन परंपरेच्याविरोधात असल्याचं म्हटलं आहे. हिंदू धर्मात एकाहून अधिक विवाह करण्याची परवानगी नाही. त्यामुळे तिन्ही बहिणींनी एका तरुणाशी लग्न करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे.