- उत्तराखंडमधील देहराडूनच्या विकासनगर परिसरात १४ फूट लांब आणि ५५ किलो वजनाचा महाकाय अजगर आढळला होता
- अजगर वनपरिक्षेत्रातील कुल्हाल नाल्यात अडकल्याने वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले
- रेस्क्यू करताना वनविभागाला ९ जणांनी सामील होऊन या बर्मीज पायथन प्रजातीच्या अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढले
वन क्षेत्रातून अनेक वन्य प्राणी रहिवाशी भागात अनेक वेळा येतात. त्यामुळे सर्वांचीच धांदल उडते. अशीच एक धांदल उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहराडूनमधील विकासनगर परिसरात उडाली. सोमवारी एका महाकाय अजगर समोर आल्याने एक खळबळ उडाली. हा महाकाय अजगर 14 फूट लांब आणि 55 किलो वजनाचा होता. अजगर एका नाल्यात अडकल्याचे निदर्शनास आले. या अजगराचा आकार आणि वजन इतके जास्त होते की, त्याला सुरक्षितपणे उचलून गाडीत ठेवण्यासाठी 9 जणांना आपली ताकद लावावी लागली. याचा व्हिडीओ सध्या सोश मीडियावर व्हायरल होत आहे.
विकासनगरच्या टिमली वनपरिक्षेत्रातील कुल्हाल परिसरातील एका नाल्यात हा अजगर दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी तातडीने पोहोचली. रेस्क्यू एक्सपर्ट आदिल मिर्झा आणि वनविभागाच्या टीमने अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला सुरक्षित बाहेर काढले. हा अजगर 'बर्मीज पायथन' प्रजातीचा असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. हा एक अजगराचा दुर्मिळ प्रकार आहे. उत्तराखंडमध्ये हा अजगर आढळतो.
अजगर हा संरक्षित जीव असल्याने त्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. हे करत असताना वन विभागाच्या जवानांना अक्षरश: घुम फुटला. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, या अजगराला जवळच्या दाट जंगलात सोडून देण्यात आले आहे. वनविभागाने नागरिकांना अशा वन्यजीवांना इजा न करण्याचे आणि काही आढळल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे. अजगराचे सुरक्षित रेस्क्यू झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
जेव्हा लोकांनी 14 फूट लांब अजगर पाहिला, तेव्हा संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. धक्कादायक बाब म्हणजे हा अजगर इतका जड होता की त्याला हलवणे साध्या माणसाचे काम नव्हते. याची माहिती मिळताच सर्पमित्र आदिल मिर्झा आणि वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. अजगराचा अक्राळविक्राळ अवतार पाहून सुरुवातीला बचाव पथकही थोडे धास्तावले होते. मात्र, मोठ्या शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या 55 किलो वजनाच्या अजगराला बाहेर काढले. त्याला गाडीपर्यंत नेण्यासाठी 9 लोकांची मदत घ्यावी लागली, यावरून त्याच्या अवाढव्य शरीराचा अंदाज येतो. वनविभागाने या अजगराला जंगलात सुरक्षित सोडले आहे. जंगलाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही वन्यजीवाला स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.