Bengal Election Result : 'त्या' 90 लाख मतदारांनी गेम फिरवला? बंगालमधील ममतांच्या पराभवाचे 'इनसाईड' गणित उघड

West Bengal Result Analysis: या निवडणुकीत एक सर्वात महत्त्वाची आणि वादग्रस्त ठरलेली गोष्ट म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR.

जाहिरात
Read Time: 3 mins
West Bengal Result Analysis: पश्चिम बंगालच्या राजकारणात यावर्षी एक मोठा भूकंप झालाय.
मुंबई:

West Bengal Result Analysis: पश्चिम बंगालच्या राजकारणात यावर्षी एक मोठा भूकंप झालाय. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. पण या निकालांमागे केवळ जनतेचा कल होता की अजून काही? या निवडणुकीत एक सर्वात महत्त्वाची आणि वादग्रस्त ठरलेली गोष्ट म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR. या प्रक्रियेमुळे पश्चिम बंगालमधील तब्बल 90 लाखांहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून कापली गेली. आता निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर या नावे कापण्याचा थेट फटका तृणमूल काँग्रेसला बसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

काय आहे SIR आणि नावे कापण्याचे गणित

निवडणूक आयोगाने मृत आणि दुबार मतदारांची नावे यादीतून काढण्यासाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये SIR प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेनंतर बंगालमधील 7.66 कोटी मतदारांपैकी तब्बल 90,83,345 मतदारांची नावे बाद करण्यात आली. 

Advertisement

तृणमूल काँग्रेसने या प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच पक्षपातीपणाचा आरोप केला होता. आपला हक्काचा मतदार या प्रक्रियेमुळे मतदानापासून वंचित राहू शकतो, अशी भीती ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती आणि निकालांमधील आकडेवारी पाहता ती भीती खरी ठरल्याचे दिसत आहे.

( नक्की वाचा : Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी? )
 

जिथे जास्त नावे कापली गेली तिथे भाजपचा विजय

मतदार यादीतून नावे कमी होण्याचा आणि भाजपच्या विजयाचा एक विशेष पॅटर्न या निवडणुकीत पाहायला मिळाला. ज्या 147 मतदारसंघात 25,000 पेक्षा जास्त मतदारांची नावे कापली गेली, त्यापैकी 95 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. याउलट तृणमूल काँग्रेसला अशा केवळ 51 जागा जिंकता आल्या. 

ज्या 67 मतदारसंघात 15,000 ते 25,000 नावे कमी झाली, तिथेही भाजपने 47 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर तृणमूलला फक्त 19 जागांवर समाधान मानावे लागले.

( Bengal election Result : बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच 'हा' निर्णय लागू होणार; PM मोदींची दिल्लीतून मोठी घोषणा )
 

कमी नावे कमी झालेल्या जागांवरही भाजपची बाजी

हा कल केवळ मोठ्या प्रमाणावर नावे कापलेल्या मतदारसंघांपुरता मर्यादित नव्हता. ज्या 62 मतदारसंघांमध्ये 5,000 ते 15,000 मतदारांची नावे कमी झाली, तिथेही भाजपने 50 जागा जिंकून तृणमूलला धोबीपछाड दिली. 

Advertisement

विशेष म्हणजे, ज्या 13 मतदारसंघांमध्ये नावे कापण्याचे प्रमाण 5,000 पेक्षा कमी होते, त्या सर्वच्या सर्व 13 जागा भाजपने आपल्या खिशात घातल्या आहेत. यावरून असे दिसते की, मतदार यादीतील या बदलांचा भाजपला मोठा फायदा झाला आहे.

तृणमूलचे बालेकिल्ले ढासळले

मुर्शिदाबाद, उत्तर 24 परगणा आणि मालदा हे जिल्हे तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र, SIR प्रक्रियेत सर्वाधिक नावे याच जिल्ह्यांतून कापली गेली. मुर्शिदाबादमध्ये 4.55 लाखांहून अधिक नावे कमी झाली. याचा परिणाम असा झाला की, 2021 मध्ये 22 पैकी 20 जागा जिंकणाऱ्या तृणमूलला यावेळेस केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला. अल्पसंख्याक मतांचे विभाजन आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण यामुळे येथे भाजपला मोठे यश मिळाले.

Advertisement

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. येथे 3.25 लाखांहून अधिक नावे यादीतून गायब झाली. परिणामी, तृणमूलच्या जागा 28 वरून घसरून थेट 8 वर आल्या. मालदा जिल्ह्यातही तृणमूलच्या जागा 8 वरून 6 वर आल्या आहेत. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या या राज्यामध्ये 91 लाख मतदार अपात्र ठरवणे, ही या निवडणुकीतील सर्वात मोठी कलाटणी देणारी घटना ठरली आहे. याच प्रक्रियेने बंगालमधील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.