जाहिरात

Bengal election Result : बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच 'हा' निर्णय लागू होणार; PM मोदींची दिल्लीतून मोठी घोषणा

West Bengal election Result : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून बंगालमधील आगामी भाजपा सरकारच्या पहिल्या कॅबिनेट निर्णयाची मोठी घोषणा केली आहे.

Bengal election Result : बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच 'हा' निर्णय लागू होणार; PM मोदींची दिल्लीतून मोठी घोषणा
West Bengal election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मुंबई:

West Bengal election Result :  पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंगालमधील आगामी भाजप सरकारच्या पहिल्या कॅबिनेट निर्णयाची मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आयुष्मान भारत योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्र सरकारची ही महत्त्वपूर्ण आरोग्य योजना राज्यात लागू करण्यात आली नव्हती.

भयमुक्त बंगाल आणि मोदींची गॅरंटी

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात बंगालमधील बदलत्या वातावरणावर विशेष भाष्य केले. बंगालमध्ये भाजप असे भयमुक्त वातावरण निर्माण करून दाखवेल, ही मोदींची गॅरंटी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये हिंसाचार, भीती आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येत असत, मात्र यावेळी संपूर्ण देशाने एक वेगळी बातमी ऐकली.

पश्चिम बंगालमध्ये प्रथमच शांततेत मतदान पार पडले असून निवडणूक हिंसाचारात एकाही निष्पाप नागरिकाचा बळी गेला नाही, ही ऐतिहासिक बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचे हे चक्र थांबवून बंगालच्या सेवेसाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले.

( नक्की वाचा : Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला )
 

कार्यकर्त्यांचे बलिदान आणि नवा सूर्योदय

बंगालमधील या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे. केरळ आणि बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांना अनेक अत्याचार आणि संकटांचा सामना करावा लागला आहे, तरीही त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला. अनेक महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन केला असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. 

हा विजय बंगालच्या जनतेला समर्पित करतानाच, 4 मे 2026 ची ही संध्याकाळ जरी मावळत असली, तरी बंगालच्या पवित्र भूमीवर आता विकासाचा एक नवा सूर्योदय झाला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

( नक्की वाचा : Tamil Nadu Election 2026 महिलांना सोनं ते तरुणांना पगार; Thalapathy Vijay यांनी कशी जिंकली तामिळनाडू निवडणूक? )

लोकशाहीची ताकद आणि विक्रमी मतदान

भारताला मदर ऑफ डेमोक्रेसी का म्हटले जाते, हे पाच राज्यांच्या जनतेने जगाला दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकशाही ही आमच्यासाठी केवळ एक राजकीय व्यवस्था नसून ती आमच्या नसानसात धावणारा संस्कार आहे, असे त्यांनी सांगितले. 

पश्चिम बंगालमध्ये झालेले सुमारे 93 टक्के मतदान हे आपल्यातच एक जागतिक विक्रम आहे. यासोबतच आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही मतदानाचे नवे विक्रम प्रस्थापित झाले असून महिलांची मोठी भागीदारी ही भारतीय लोकशाहीसाठी एक सकारात्मक चित्र असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com