अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी मित्र पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्राबाबूंच्या आंध्रप्रदेशच्या पदरात भरभरून टाकले आहेत. या अर्थसंकल्पातून मित्रांची काळजी घेतल्याचे दिसून येते. शिवाय या अर्थसंकल्पातून आपले महत्व काय आहे हे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी दाखवून दिले आहे. अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशसह बिहारला मोठा निधी देण्याची घोषणा केली आहे. शिवाय वेगवेगळ्या योजनाही या दोन राज्यात राबवल्या जाणार आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा
आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केल्या आहेत. आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या शिवाय आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठीही मोठा निधी दिला जाईल असे सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. आंध्र प्रदेशला या अर्थ संकल्पात विशेष महत्व दिले गेले आहे. शिवाय आंध्रमध्ये रस्त्यांचे जाळेही उभारले जाणार आहे. पुरनियंत्रणासाठीही आंध्र प्रदेशला निधी दिला जाणार आहे. विशाखापट्टणम ते चेन्नई असा या कॉरिडोअरची घोषणाही या अर्थ संकल्पात केली आहे. त्याच बरोबर पंतप्रधान गृह योजनेसाठी आंध्रला 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Budget 2024 Live Updates : नव्या कर प्रणालीनुसार 'टॅक्स स्लॅब'मध्ये बदल
बिहारच्या पदरातही मोठं दान
बिहारसाठीही मोठ्या घोषणा या अर्थ संकल्पात करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये नवीन विमानतळ, क्रिडांगण, रूग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय कौशल्य विकास केंद्र बिहारमध्ये उभारले जाणार आहे. बिहारमधील रस्त्यांसाठी 26 हजार करोड दिले जाणार आहेत. त्याच बरोबर बिहारमध्ये नवा पॉवर प्रोजेक्ट उभारला जाईल. पूर नियंत्रणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पर्यटनाच्या विकासातही बिहारला झुकते माप देण्यात आले आहे. गया इथल्या मंदिरांचा विकास केला जाणार आहे. शिवाय नालंदा विद्यापीठाला पर्यटन केंद्र बनवले जाईल. बिहारमध्ये महाबोधी कोरीडोअर बनवण्यात येईल.
महाराष्ट्राच्या पदरात काय?
एकीकडे आंध्र प्रदेश, बिहार, ओडीशा या राज्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जात होत्या. त्याच वेळी महाराष्ट्राच्या पदरात मात्र काहीच पडले नसल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचा किंवा मुंबईच उल्लेख अर्थसंकल्पात नव्हता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजनेची घोषणा केली आहे. केंद्राने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेशाच्या विकासासाठी या योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत मनुष्यबळ विकास, मूलभूत विकासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. या योजनेत बिहारसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अमृतसर-कोलकत्ता ओद्योगिक कॉरिडोर अंतर्गत गयामध्ये औद्योगिक केंद्र तयार करण्यात येईल. सांस्कृतिक केंद्रांना आधुनिक आर्थिक केंद्राअंतर्गत विकसित केलं जाईल.