Terror Attack : दहशतवाद्यांनी पाणी मागितलं आणि... पोलिसांनी सांगितला थरारक अनुभव!

Jammu Kashmir Terror Attack कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी नेमकं काय झालं? याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये 3 दहशतवादी हल्ले झाले आहेत.
मुंबई:

Jammu Kashmir Terror Attack जम्मू काश्मीर गेल्या तीन दिवसांमध्ये तीन दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. रविवारी (10 जून) संध्याकाळी  रियासी जिल्ह्यात यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 9 जण ठार झाले. त्यापाठोपाठ कठुआ आणि  डोडा भागालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केलंय. डोडामधील हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झालाय. तर कठुआमध्ये एक जण जखमी झाला आहे. कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी नेमकं काय झालं? याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

कठुआ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी घरोघरी जाऊन पिण्यासाठी पाणी मागितलं होतं. पण, जागरुक नागरिकांनी त्यांना प्रतिसाद न देता दार बंद केलं, अशी माहिती जम्मू झोनचे अतिरिक्त ADGP आनंद जैन यांनी दिली आहे. यामधील एका दहशदवाद्याला एन्काऊन्टरच्या दरम्यान ठार मारण्यात आलं. तर दुसरा यावेळी जखमी झाला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. 

'दहशतवाद्यांनी काही घरांमध्ये पाणी मागितलं. नागरिकांना त्यांचा संशय आल्यानं त्यांनी दार लावून घेतलं. काही जण ओरडू आणि रडू लागले. या आवाजामुळे दहशतवादी गोंधळले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला. यावेळी त्या भागातून जात असलेली एक व्यक्ती जखमी झाली,' अशी माहिती जैन यांनी दिली. 

या हल्ल्याची माहिती समजताच सुरक्षा जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं. यावेळी एक दहशतवादी सुरक्षा दलावर ग्रेनेड टाकण्याच्या प्रयत्नात असताना ठार झाला. त्यानंतर दुसऱ्या दहशतवाद्याच्या शोधासाठी परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. 

या हल्ल्यात ओमकार नाथ हे स्थानिक नागरिक जखमी झाले. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात आणखी जीवतहानी झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

( नक्की वाचा : Terrorist Attack बस दरीत पडली, तरी गोळीबार सुरुच होता! भाविकांनी सांगितला भयंकर अनुभव )
 

डोडामध्ये लष्करी चौकीवर हल्ला

दरम्यान, मंगळवारी (11 जून) रात्री दहशतवाद्यांनी डोडा भागातील सुरक्षा दलाच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवानांसह एक विशेष पोलीस अधिकारी (SPO) जखमी झाले, असल्याची माहिती जैन यांनी दिली.