Adani Health City : देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांमध्ये आघाडीवर असलेला समूह देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर अदाणी समूहाच्या वतीनं सामाजिक भान देखील नेहमी जपण्यात आलं आहे. त्याच अनुषंगानं अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी (Gautam Adani) अदाणी हेल्थ सिटी (AHC) एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी असेल अदाणी हेल्थ सिटी?
अदाणी हेल्थ सिटीची निर्मिती अदाणी ग्रुपच्या नॉन-फॉर-प्रॉफिट हेल्थकेअर शाखाद्वारे केली जाईल. त्यासाठी अदाणी समूहाने यासाठी जगातील सर्वात मोठ्या ना-नफा वैद्यकीय समूह 'मेयो क्लिनिक'शी हातमिळवणी केली आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून 1000 खाटांची सोय उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात उपचार मिळतील, असे अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी जाहीर केले आहे.
अदाणी हेल्थ सिटीची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- देशातील सर्व स्तरातील नागरिकांना परवडणारी, जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी अदाणी कुटुंब खर्चाची जबाबदारी पार पाडेल.
- अहमदाबाद आणि मुंबईमध्ये इंटीग्रेडेट हेल्थ कॅम्पस उभारण्यासाठी अदाणी कुटुंब 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देणगी स्वरुपात देणार आहेत.
- देशातील गावांसह शहरांमध्ये अशाच प्रकारचे इंटीग्रेडेट अदाणी हेल्थ सिटी उभारण्याची गौतम अदाणींची योजना आहे.
- मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी 150 विद्यार्थांना शिक्षण घेता येईल, 80 निवासी डॉक्टरही रुग्णसेवेसाठी नेमले जाणार आहेत
- 'अदाणी हेल्थ सिटी' असे या प्रकल्पाचे नाव देण्यात आले आहे.
अमेरिकेतील मेयो क्लिनिकची साथ
अदाणी समूहाने या निर्मितीसाठी अमेरिकेतील प्रसिद्ध मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टिंग (मेयो क्लिनिक) सोबत भागीदारी केली आहे.मेयो क्लिनिक डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञानावर आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढवण्यावर भर देईल. तसेच तंत्रज्ञानाच्या एकात्मतेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
( नक्की वाचा : 'अदाणी हेल्थ सिटी' ची घोषणा, मुंबई आणि अहमदाबादमध्ये सुरु होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल! )
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)