रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. संध्याकाळी 6:30 वाजता पुतिन यांचे विमान नवी दिल्लीत उतरले. त्यांच्या आगमनापूर्वीच त्यांची संपूर्ण सुरक्षा तुकडी आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये तैनात झाली होती.
हॉटेलमध्ये सध्या कडक पाळत ठेवण्यात आली असून, सर्व खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. कॉरिडॉरमध्ये बॅरिकेड्स लावले आहेत आणि प्रवेशद्वारांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. अनेक सुरक्षा संस्थांनी येथे ग्रिड्स, प्रवेश नियंत्रणे आणि रॅपिड अॅक्शन टीम तैनात केल्या आहेत, जेणेकरून ही भेट सुरळीत पार पडेल.
पुतीन यांच्यासाठी शाही निवास, 'चाणक्य सूट'
डीएनए इंडियाच्या अहवालानुसार, अध्यक्ष पुतिन आयटीसी मौर्यच्या (ITC Maurya) सर्वात आलिशान सूटमध्ये, म्हणजेच चाणक्य सूटमध्ये मुक्काम करणार आहेत. याची तुलना अनेकदा आलिशान चंद्रगुप्त सूटशी केली जाते. गेल्या 40 वर्षांपासून हे हॉटेल जागतिक स्तरावरील मान्यवरांना सेवा देत आहे आणि चाणक्य सूट अनेक जागतिक नेत्यांचे यजमान राहिले आहे.
चानक्या सूटचं भाडं
4,600 चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या सूटचे एका दिवासाचे भाडे अंदाजे 8 ते 10 लाख रुपये आहे. सूटचे इंटिरियर्स भव्यता आणि वैभवाचा मिलाफ आहेत. येथे रेशमी पॅनेलच्या भिंती, गडद लाकडी फरशी आणि टायब मेहता यांची कलाकृती अशा अमूल्य कलाकृती आहेत.
चाणक्य सूटमध्ये मास्टर बेडरूम, वॉक-इन कपाटासह खाजगी स्टीम रूम आणि सौना, सुसज्ज जिम, 12 आसनी डायनिंग रूम आणि नवी दिल्लीचे विहंगम दृश्य यासारख्या सुविधा आहेत.
आयटीसी मौर्य बद्दल
आयटीसी मौर्य 40 वर्षांहून अधिक काळ जागतिक मान्यवरांसाठी एक प्रमुख निवड राहिले आहे. हॉटेलमध्ये 411 खोल्या आणि 26 सूट्स आहेत. येथे एक्झिक्युटिव्ह क्लब, द टॉवर्स आणि आयटीसी वन यासह अनेक श्रेणीतील निवास व्यवस्था उपलब्ध आहे. पुतीन यांच्या दौऱ्यादरम्यान हॉटेलची लक्झरी आणि सुरक्षेचा अनोखा समन्वय साधत, राष्ट्राध्यक्षांना राजेशाही आणि खाजगी अनुभव देत आहे.