भोजपुरीचे प्रसिद्ध कवी आणि लोकनाट्य परंपरेचे संस्थापक भिखारी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त बिहारमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठाकूर यांना 'भोजपुरी शेक्सपियर' म्हणून ओळखले जाते. या निमित्ताने त्यांना 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सारणचे खासदार राजीव प्रताप रूडी यांनी भिखारीठाकूर यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे. रूडी हे बिहारच्या सर्व खासदारांच्या सह्या घेऊन एक संयुक्त प्रस्ताव भारत सरकारला सादर करणार आहेत.
( नक्की वाचा: महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीची भुजबळांनी काढली हवा, पवारांसमोर काय म्हणाले? )
'भारतरत्न' की 'पद्मभूषण'?
सारण विकास मंचचे संयोजक शैलेंद्र प्रताप सिंह यांनीही भारत सरकारकडे मागणी केली आहे की, भोजपुरी लोकनाट्याचे संस्थापक आणि महान समाजसुधारक भिखारी ठाकूर यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे. त्यांनी म्हटले की, सध्या देश आणि राज्यात एकाच पक्षाची सरकारे आहेत, तरीही दोघांनीही भिखारी ठाकूर यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भोजपुरीला सन्मान मिळवून देण्याचे काम भिखारीनी केले!
सिंह यांनी सांगितले की, सारणचे खासदार राजीव प्रताप रूडी यांनी भिखारी ठाकूर यांना पद्मभूषण देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी केली आहे. रूडी यांनी केलेल्या मागणीला कोणताही विरोध नाही. मात्र भिखारी ठाकूर यांचे कर्तृत्व फार मोठे असून त्यांनी भोजपुरी भाषा आणि संस्कृतीला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यांनी आपल्या नाटकांतून आणि गाण्यांतून सामाजात जागरूकता आणि राष्ट्रभावना निर्माण करण्याचे काम केले. त्यांनी दुर्बळांचे शोषण, बालविवाह, महिलांवरील अत्याचार, व्यसने आणि स्थलांतरितांचे दुःख यांसारख्या मुद्दांवरून समाजामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न केला. ही एक प्रकारची सामाजिक क्रांती होती असे सिंह यांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा: आणीबाणीत संजय गांधींची 'ती' कृती अन् शशी थरूर यांचा टीकेचा सूर, पण... )
सिंह यांनी पुढे म्हटले की, भिखारी ठाकूर यांची 'बिदेसिया' ही केवळ एक नाट्यकृती नाही, तर स्थलांतरित मजुरांच्या वेदनेची कथा आहे, जी आजही तितकीच प्रभावी आहे जितकी त्यांच्या काळात होती. त्यांची 'बेटी-बेचवा' ही रचना बालविवाहाच्या समस्येवर व्यंग्यात्मक रितीने टीका करते, तर 'गबरघिचोर' स्त्रियांच्या सन्मानाबद्दल समाजात वेगळा विचार रुजवण्याचे काम करते. सिंह यांचे म्हणणे आहे की भिखारी ठाकूर हे केवळ कलाकार नव्हते, तर लोककलाकार आणि समाजातील वाईट चालिरीतींवरोधात उभे ठाकणारे खरे नायक होते. भोजपुरी समाजासाठी ते आदरणीय असून त्यांना भारतरत्न पुरस्कार देणे गरजेचे असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.