लोकसभा निवडणुकांचा इतिहास : देशात सर्वात पहिल्यांदा कुणी मतदान केलं होतं हे माहिती आहे?

लोकसभा निवडणुकीत सर्वात पहिल्यांदा मतदान कुणी केलं? ते देशाचे पहिले मतदार कसे ठरले हे माहिती आहे का?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ संपत आलेला असून आता अठराव्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालंय. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान यंदा निवडणूक होणार आहे. तर, चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.  18 वर्ष पूर्ण झालेले सर्व नागरिक मतदान करण्यासाठी पात्र असतील.

निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य

देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार राज्यघटनेद्वारे देण्यात आलेला आहे. मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी महिला तसंच अन्य वर्गांना अन्य देशांमध्ये संघर्ष करावा लागला आहे. पण, भारतीय राज्यघटनेनं एकाच निर्णयानं सर्वांना हा अधिकार बहाल केला. हे भारतीय निवडणूक प्रणालीचं मोठं वैशिष्ट्य आहे.

सुरुवातीला 21 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. 1989 साली झालेल्या लोकसभा निवणुकांपासून ही मर्यादा 18 करण्यात आली. 

कधी झाल्या पहिल्या निवडणुका?

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. त्यानंतर 1952 साली देशात पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत 364 जागा जिंकत काँग्रेस पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं. पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.

Advertisement

कुठं झालं पहिलं मतदान?

हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे मतदानाच्या दरम्य़ान मोठ्या हिमवर्षावाची शक्यता लक्षात घेऊन चार महिने पूर्वीच म्हणजे 1951 साली मतदान घेण्यात आले.

या निवडणुकीत श्याम सरन नेगी यांनी पहिल्यांदा मतदान केले. त्यामुळे ते देशातले पहिले मतदार ठरले. नेगी पहिले मतदार ठरल्याचा किस्सा देखील तितकाच खास आहे.

कसे ठरले पहिले मतदार?

श्याम सरन नेगी 1951 साली शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी होती. देशात पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. नेगी देखील मतदान करण्यासाठी प्रचंड उत्साही होते.

Advertisement

निवडणूक कर्मचारी साधरणपणे सर्वात पहिल्यांदा मतदान करतात. 'दैनिक जागरण' नं दिलेल्या माहितीनुसार नेगी मतदानाच्या दिवशी सकाळी 6.15 वाजताच त्यांचं मतदार म्हणून नाव असलेल्या कल्पा येथील केंद्रात पोहोचले.  त्यांना अन्य केंद्रावर ड्यूटीसाठी जायचं असल्यानं त्यांनी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना लवकर मतदान करु देण्याची विनंती केली.

कल्पा येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य केली, आणि त्यांना मतदान करण्यास परवानगी दिली. नेगी यांनी मतदान केलं तेंव्हा देशात अन्य कुठंही मतदानाची प्रक्रिया सुरु झाली नव्हती. त्यामुळे ते देशातील पहिले मतदार ठरले.

Advertisement

प्रत्येक निवडणुकीत मतदान

नेगी यांचे 2022 साली वयाच्या 106 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 1951 ते 2022 या 71 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं. 2 नोव्हेंबर 2022 रोजी 34 व्यांदा मतदान केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचं निधन झालं. 

निवडणूक आयोगानंही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेगी यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला होता.

Topics mentioned in this article