दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमधून सुटल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत राजीनामा देण्याची घोषणा केली. केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा करताच दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? ही चर्चा सुरु होती. या चर्चेला अखेर मंगळवारी (17 सप्टेंबर) पूर्णविराम मिळाला. आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्या आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. पक्षाच्या बैठकीत स्वत: केजरीवाल यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला अन्य आमदारांनीही पाठिंबा दिला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमी पक्षात अनेक दावेदार होते. पण, अवघ्या 4 वर्षांपूर्वी आमदार झालेल्या 43 वर्षांच्या आतिशी यांनी या सर्वांना मागं टाकलं. त्या सुषमा स्वराज, शिला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. आम आदमी पक्षात पहिल्यांदाच केजरीवाल यांच्याशिवाय एखाद्या व्यक्तीला दिल्लीचं मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. आतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची कारण काय आहेत ते पाहूया
अडचणीच्या परिस्थितीमध्ये आघाडीवर
आम आदमी पक्षासाठी गेली काही वर्ष आव्हानात्मक ठरली आहेत. माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर मार्च 2023 साली आतिशींनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आतिशी यांच्यापुढं अनेक आव्हानं होती. पक्षाच्या खडतर काळात त्यांनी आघाडीवर राहून या आव्हानांचा सामना केला.
( नक्की वाचा : PM Modi Birthday : डिजिटल इंडिया ते कलम 370, देश बदलणारे हे आहेत मोदींचे 9 मोठे निर्णय )
आतिशी यांच्याकडं तब्बल 13 मंत्रालयांचा कारभार होता. त्यांनी सरकारमधील जबाबदारीसह पक्षाची बाजूही दमदारपणे माध्यमांसमोर मांडली. अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षाचा कोणताही मोठा नेता बाहेर नव्हता. त्या काळात त्यांनी आघाडीवर राहून पक्षाचं नेतृत्त्व केलं. त्यामुळेच त्या आज अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात विश्वासू नेत्या मानल्या जातात.
शिक्षण मंत्री म्हणून काम
आम आदमी पक्षानं नेहमीच शिक्षणावर मोठा भर दिला आहे. पक्षाच्या प्रचारातील तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मनिष सिसोदिया तुुरुंगात गेल्यानंतर आतिशी दिल्लीच्या शिक्षण मंत्री बनल्या. त्यांनी सिसोदिया यांचंच काम पुढं नेलं. पक्ष सर्वात अडचणीत असताना कोणतीही चूक न करता त्यांनी काम केलं. त्यामुळेच दिल्ली विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असतानाच त्यांनी मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला.
( नक्की वाचा : हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
महिला मतदारांना संदेश
गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानातील महिलांती भूमिका निर्णायक ठरली आहे. महिलांचा विश्वास असलेल्या राजकीय पक्षालाच निवडणुकीत यश मिळालंय. पक्षातील दिग्गज पुरुष नेत्यांना बाजूला करत आतिशी यांनी मुख्यमंत्री करताना केजरीवाल यांनी या गोष्टीचाही विचार केला असावा. दिल्ली विधानसभेच्या आगमी निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना सकारात्मक संदेश देण्याचं काम या निर्णयातून केजरीवाल यांनी केलंय.