Daily Data Limit Recharge Plan: रिचार्ज प्लॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या डेटाचं पुढे काय होतं?

सध्याच्या नियमांनुसार, बहुतांश टेलिकॉम कंपन्या 'डेली डेटा रिसेट' पॉलिसीवर काम करतात. याचा अर्थ असा की दर 24 तासांनी तुमचा डेटा कोटा शून्यावरून पुन्हा सुरू होतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

आपल्यापैकी अनेकजण प्रीपेड रिचार्ज प्लॅन वापरतात. डेटा पॅक संपला की नवीन रिचार्ज करायचं आणि डेटा वापरायचा ही पद्धत आपण सगळेजण अवलंबतो. मात्र त्या डेटा पॅकमध्ये शिल्लक राहिलेल्या डेटाचं नंतर काय होतं असा अनेकांना प्रश्न पडतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही 2GB चा डेटा रिचार्ज केला आणि तुम्ही डेटा पॅक संपायच्या मुदतीपर्यंत 1.5 जीबी डेटा वापरला. तर उरलेला 0.5जीबी डेटा मुदत संपल्यानंतर कुठे जातो हे अनेकांना माहिती नाहीये. 

नक्की वाचा: नोकरदारांसाठी मोठी बातमी!

संसदेत उपस्थित झाला डेटाचा मुद्दा

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. भारतात कोट्यवधी नागरिक विविध टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन वापरतात. या प्लॅन्समध्ये प्रामुख्याने दररोज 1.5 जीबी, 2 जीबी किंवा 3 जीबी अशा स्वरूपात डेटा मर्यादा दिली जाते. मात्र, अनेकदा वापरकर्त्यांचा हा दैनंदिन डेटा पूर्णपणे वापरला जात नाही. दिवसाच्या शेवटी काही प्रमाणात डेटा शिल्लक राहतो. हा शिल्लक राहिलेला डेटा नेमका कुठे जातो आणि त्याचे काय होते, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांना सतावत आहे. याच संवेदनशील मुद्द्यावर राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत आवाज उठवून टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Advertisement

पैसे पूर्ण भरूनही डेटा पूर्ण वापरता येत नसल्याची तक्रार

राघव चढ्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संदर्भात सविस्तर पोस्ट केली असून संसदेतही यावर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, जेव्हा एखादा ग्राहक 2 जीबी डेटाचा रिचार्ज करतो, तेव्हा त्याने त्या पूर्ण डेटासाठी पैसे मोजलेले असतात. जर एखाद्या दिवशी त्या ग्राहकाने केवळ 1.5 जीबी डेटा वापरला आणि उर्वरित 0.5 जीबी डेटा शिल्लक राहिला, तर तो डेटा मध्यरात्रीनंतर आपोआप गायब होतो. टेलिकॉम कंपन्या हा डेटा पुढील दिवसासाठी वापरू देत नाहीत किंवा ग्राहकाला त्याचे पैसेही परत मिळत नाहीत. चढ्ढा यांनी या प्रक्रियेला एक प्रकारे ग्राहकांची लूट असे संबोधले आहे. त्यांनी स्पष्ट केले की हा कोणताही तांत्रिक बिघाड नसून कंपन्यांचे ठरवून केलेले धोरण आहे. ग्राहकाने पूर्ण पैसे देऊनही त्याला तो डेटा वापरता येत नाही, कारण तो ठराविक वेळेनंतर समाप्त केला जातो.

नक्की वाचा: सिलिंडर रिकामा आहे की भरलेला? कसे तपासायचे?

डेटा रोलओव्हरची मागणी

सध्याच्या नियमांनुसार, बहुतांश टेलिकॉम कंपन्या 'डेली डेटा रिसेट' पॉलिसीवर काम करतात. याचा अर्थ असा की दर 24 तासांनी तुमचा डेटा कोटा शून्यावरून पुन्हा सुरू होतो. यामुळे ग्राहकावर एक प्रकारचे दडपण येते की त्याने दिलेला डेटा त्याच दिवशी संपवला पाहिजे, अन्यथा तो वाया जाईल. या पद्धतीमुळे ग्राहकांना इंटरनेटचा अनावश्यक वापर करावा लागतो किंवा त्यांच्या हक्काचा डेटा गमवावा लागतो. राघव चढ्ढा यांनी मागणी केली आहे की, ग्राहकांनी ज्या डेटासाठी पैसे दिले आहेत तो डेटा 'कॅरी फॉरवर्ड' किंवा 'रोलओव्हर' झाला पाहिजे. म्हणजेच, आजचा शिल्लक राहिलेला डेटा उद्याच्या कोट्यात जोडला गेला पाहिजे, जेणेकरून ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. चढ्ढा यांनी उपस्थित केलेला असंख्य ग्राहकांशी निगडीत असल्याने दूरसंचार विभाग याबाबत काय उत्तर देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.