Real Life Story : स्वत:चं आयुष्य संपवायला गेलेल्या एका महिलेला निसर्गाने दुसरी संधी दिली. ज्या आयुष्याला ती कंटाळली होती, त्याच आयुष्याला वाचवण्यासाठी ती रात्रभर एका झाडावर राहिली. तुम्हाला वाटत असेल की ही एखाद्या चित्रपटाची कथा आहे, पण ही कानपूरमधील एका महिलेची खरी हकीकत आहे. ही गोष्ट वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
नेमकं काय घडलं?
कानपूरच्या अहिरवां भागात राहणाऱ्या 43 वर्षीय मालती देवी यांच्या आयुष्यात मागील काही काळापासून खूप चढ-उतार चालू होते. लग्नाला 23 वर्षे झाली तरी त्यांना मूलबाळ नव्हते, याच कारणामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या रिक्षाचालक पतीमध्ये सतत वाद होत असत.
अशातच, शुक्रवारच्या संध्याकाळीही दोघांमध्ये एका क्षुल्लक गोष्टीवरून भांडण झाले. पतीने कामावरून परत आल्यावर चहा बनवायला सांगितला, पण पत्नीने नकार दिला. याच गोष्टीवरून वाद इतका वाढला की, महिलेने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. औषध आणण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली आणि थेट जाजमऊ गंगा पुलावर पोहोचली. रात्रीच्या अंधारात साधारण 10.30 वाजता तिने सर्व दु:खांना संपवण्याच्या निर्धारानं स्वतःला गंगेच्या जोरदार प्रवाहाच्या स्वाधीन केले.
( नक्की वाचा : नवऱ्याची मेहनत, बायकोचा विश्वासघात! लायब्ररी विकून पत्नीला शिकवले, पोलीस होताच तिने.... )
पण कदाचित गंगा मातेला तिचा मृत्यू मान्य नव्हता. लाटांनी तिला बुडवण्याऐवजी चंदन घाटाच्या किनाऱ्यावर आणून फेकले. काही तासांनंतर जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा ती गुडघ्यांपर्यंत पाण्यात होती. शरीर दुखत होते आणि थंडीने ती थरथर कापत होती. तिने उठण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिची नजर जवळच्या पाण्यात असलेल्या एका सावलीवर पडली. ती एखाद्या महाकाय मगरीसारखी दिसत होती.
ज्या महिलेने काही तास आधी मृत्यूची इच्छा केली होती, आता मृत्यूला साक्षात समोर पाहून तिची अवस्था वाईट झाली. जगण्याची इच्छा अचानक प्रबळ झाली. तिने पूर्ण ताकद लावून तिथून पळ काढला आणि जवळच्या एका बागेत शिरली. अंधारात तिला एक पेरूचे झाड दिसले आणि ती कोणताही विचार न करता त्यावर चढून बसली.
सकाळी साधारण 5 वाजता जेव्हा हलका उजेड झाला, तेव्हा तिला काही लोक ये-जा करताना दिसले. तिने हिंमत करून जोरात आवाज दिला. तिचा आवाज ऐकून लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. जाजमऊ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिला झाडावरून खाली उतरवले. जेव्हा महिलेने पोलीस चौकीत आपली आपबीती सांगितली, तेव्हा पोलीसही थक्क झाले. पोलिसांनी तिच्या पतीला बोलावले आणि दोघांनाही समजावले. पती-पत्नीला एकमेकांना साथ देण्याचा आणि शांततेने राहण्याचा सल्ला देऊन घरी पाठवण्यात आले.