गेल्या महिन्यात सिंधुदुर्गातील गावांमध्ये धूमाकूळ घातलेल्यानंतर 'ओंकार' हत्ती पुन्हा एकदा गोव्यात परतला आहे. या हत्तीचं वय 10 वर्षे असून 'ओंकार'ने सिंधुदुर्गवासीयांमध्ये दहशत निर्माण केलीच आहे शिवाय मोठे नुकसानही केले आहे. अत्यंत उपद्रवी असलेला ओंकार गोव्यात शिरल्याने तिथल्या वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अलर्ट झाले आहे. गोवा वन विभागाने तातडीने पाऊले उचलायला सुरूवात केली असून ओंकार हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 25 कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम ओंकारच्या सातत्याने मागावर आहे. ही टीम ओंकार हत्तीला पुन्हा महाराष्ट्रात पिटाळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
नक्की वाचा: भराडी देवीने कौल दिला! आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली
दोन दिवस पूर्ण आराम, नंतर धुमाकूळ घालण्यास सुरूवात
ओंकार हत्ती शुक्रवारी किंवा शनिवारी गोव्याच्या वन हद्दीत शिरला असावा असा अंदाज आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत या हत्तीने उगवे (Ugvem) आणि तांबोसे (Tamboxem) या गावांमध्ये शेतीचे आणि एका चारचाकी वाहनाचे नुकसान केल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत. सप्टेंबरमध्येही ओंकार हत्तीने अशाच प्रकारे धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रचंड त्रासले होते. गोवा वन विभाग, वन्यजीव आणि पर्यावरण-पर्यटन विभागाचे संरक्षक नवीन कुमार यांनी म्हटले की, ओंकार हत्तीला गोव्यातील वातावरण अंगवळणी पडल्याचे दिसते आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ओंकार परतल्याच्या बातम्या आणि व्हिडिओ प्रसारित होताच, आम्ही घटनास्थळी धाव घेतली. महाराष्ट्रातून प्रवास करून आल्याने ओंकार हत्ती दमला होता. दोन दिवस तो फक्त आराम करत होता असं वाटतं आहे. ओंकारच्या हालचालींवर लक्ष ठेवतानाच, त्याच्या आरोग्याचीही काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. 'ओंकार' सध्या पेडणे (Pernem) परिसरात असल्याचे नवीन कुमार यांनी म्हटलंय.
नक्की वाचा: सोनिया गांधी भाजपकडून निवडणूक लढवणार? केरळमध्ये घडतंय तरी काय?
कारचं आणि झाडांचे नुकसान
ओंकार हत्ती रात्रीच्या वेळी दोन गावांत फिरत होता असं तिथल्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तांबोसेमध्ये त्याने केळीच्या आणि सुपारीचे नुकसान केल्याचे कळते आहे. उगवेमध्ये त्याने एका कारचे नुकसान केलं आणि एक झाडही जमीनदोस्त केलं. तो मोपा (Mopa) परिसरातही फिरताना दिसल्याचं कळतं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 'ओंकार' आपल्या कळपापासून वेगळा झाला होता आणि सुमारे 25 किलोमीटरचा प्रवास करून सिंधुदुर्गमधून सप्टेंबरमध्ये गोव्यात आला होता. महाराष्ट्राच्या वन विभागाने ड्रोनचा वापर करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि गोव्याच्या वन विभागाला माहिती दिली होती.