Dadasaheb Bhagat Journey: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका लहान गावातून आलेल्या दादासाहेब भगत या तरुणांच्या यशाचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कथेसारखा आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात वाढलेल्या दादासाहेब यांच्या कुटुंबात शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. तरीही त्यांनी कसंबसं दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर आयटीआयचा एक छोटा कोर्स केला.
ऑफिस बॉय ते ग्राफिक डिझायनर
फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण असूनही चांगल्या भविष्याच्या शोधात दादासाहेब पुण्यात आले. सुरुवातीला त्यांना एका कंपनीत 4,000 रुपयांची नोकरी मिळाली. नंतर त्यांना इन्फोसिसमध्ये (Infosys) ऑफिस बॉयची नोकरी मिळाली, जिथे त्यांना 9000 रुपये पगार मिळत होता. इन्फोसिसमध्ये ऑफिसची स्वच्छता करणे आणि इतर छोटी कामे करणे हे त्यांचे होते. तिथे कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांना पाहून त्यांना वाटले की, 'मी हे काम का करू शकत नाही?' त्यांच्या प्रश्नावर लोकांनी 'या कामासाठी डिग्री (Degree) लागते' असे उत्तर दिले.
एका व्यक्तीने त्यांना सांगितले की ग्राफिक डिझाइन किंवा अॅनिमेशन सारख्या क्षेत्रात डिग्रीपेक्षा टॅलेंटला जास्त महत्त्व असते. ही गोष्ट त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर त्यांनी दिवसा ऑफिस बॉयचे काम केले आणि रात्री ग्राफिक डिझाइन शिकण्यास सुरुवात केली. एका वर्षात त्यांनी स्वतःला पूर्णपणे बदलले. झाडू पकडणाऱ्या हातांनी आता माऊस पकडला होता.
डिग्री नसल्याने टॅलेन्ट झाकलं
डिग्री नसल्यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळणे कठीण होते. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि फ्रीलांसिंग सुरू केले. लहान-मोठे डिझाइन प्रोजेक्ट्स घेऊन त्यांनी नंतर स्वतःची एक छोटी डिझाइन कंपनी सुरू केली. पण पैशाची कमतरता यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. याचदरम्यान कोरोनाचा काळ आला. लॉकडाऊनमुळे त्यांची कंपनी बंद पडली आणि त्यांना गावात परतावे लागले. गावी परतल्यावर त्यांनी हार मानली नाही, तर नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. गावात खर्च कमी असल्याने त्यांनी एक नवीन प्रॉडक्ट आयडियावर काम सुरु केले. गावात विजेची समस्या आणि स्लो इंटरनेट नेटवर्क अशा अनेक समस्या होत्या. पण त्यांनी एक उपाय शोधला. त्यांनी गावातील एका टेकडीवर तात्पुरते ऑफिस सुरु केले.
'डिझाइन टेम्प्लेट'ची सुरुवात
याच टेकडीवरून त्यांनी 'डिझाइन टेम्प्लेट' नावाचे एक प्लॅटफॉर्म सुरू केले. हे एक असे व्यासपीठ आहे जे भारतातील डिझायनर्स आणि लहान व्यावसायिकांना तयार टेम्प्लेट्स आणि डिझाइन टूल्स उपलब्ध करून देते. हळूहळू, 'डिझाइन टेम्प्लेट'ने आपली ओळख निर्माण केली. दादासाहेब केवळ स्वतःच पुढे गेले नाहीत, तर त्यांनी गावातील तरुणांनाही ग्राफिक डिझाइनचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे 'मेक इन इंडिया'चे उदाहरण म्हणून कौतुक केले.
शार्क टँक इंडियामध्येही छाप पाडली
'डिझाइन टेम्प्लेट'च्या या यशाने त्यांना प्रसिद्ध टीव्ही शो 'शार्क टँक इंडिया' मध्ये पोहोचवले. तिथे त्यांनी आपल्या कंपनीचा 10% हिस्सा 1 कोटी रुपयांना विकला. ही डील त्यांना boAt चे को फाऊंडर आणि सीएमओ अमन गुप्ता यांच्याकडून मिळाली.
D
आज दादासाहेब भगत यांची कंपनी देशभरातील डिझायनर्समध्ये चर्चेत आहे. त्यांचे पुढील उद्दिष्ट भारताला डिजिटल डिझाइनमध्ये आत्मनिर्भर बनवणे आहे. त्यांना असे प्लॅटफॉर्म तयार करायचे आहे, जे कॅनव्हा सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देईल आणि भारतीय युजर्सना त्यांच्या स्थानिक भाषेत डिझाइन करण्याची सुविधा देईल.