40 Crore Retirement Corpus : नुकताच सोशल मीडियावर एका स्टार्टअप संस्थापकाच्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला आहे. वेल्थ मॅनेजमेंट फर्म डेजर्वचे सहसंस्थापक संदीप जेठवानी यांनी एका मुलाखतीत असं काही म्हटलं की, मध्यमवर्गीय व्यक्ती आपली सॅलरी स्लिप पाहून विचारातच पडला. संदीप जेठवानी म्हणाले की, जर तुम्ही आज कोणत्याही मोठ्या शहरात १ ते २ लाख रुपये महिने खर्च करून ऐश आरामात राहत असाल तर वयाच्या साठीपर्यंत आनंदात जगण्यासाठी तुमच्याजवळ किमान ४० कोटींची बचत अपेक्षित आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
एका स्टार्टअपच्या सह-संस्थापकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जर एखाद्याला महानगरात उदा. मुंबई किंवा दिल्लीत निवृत्त व्हायचं असेल आणि मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा आणि जीवनशैली टिकवून ठेवायची असेल, तर ४० कोटी रुपयांची बचत सुद्धा कमी पडू शकते.
कमेंटचा पाऊस...
या दाव्यामुळे नेटीझन्समध्ये दोन गट पडले आहेत. काही लोकांचे मते अनेकांनी याला 'अवास्तव' म्हटलं आहे. त्यांच्या मते, सामान्य भारतीय माणूस १ ते ५ कोटी रुपयांमध्ये सुद्धा सुखाचं आयुष्य जगू शकतो. ४० कोटींची मागणी ही केवळ लक्झरी किंवा अति-श्रीमंतीचं प्रदर्शन आहे. तर काहींनी स्टार्टअप संस्थापकाच्या मताचं समर्थन केलं आहे. वाढती महागाई, शिक्षणाचा प्रचंड खर्च आणि भविष्यातील अनिश्चितता पाहता, मोठी रक्कम हाताशी असणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या असून, लोक आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार निवृत्तीसाठी लागणाऱ्या रकमेचे गणित मांडत आहेत. काही मंडळी तर हे ४० कोटी आहेत की ४० लाख? असा उपरोधिक सवालही विचारत आहे.