योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Success Story: अकोल्याच्या एका छोट्याशा गावातल्या लेकीनं संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलंय. कोणतीही महागडी ट्युशन नाही, घरी अभ्यासासाठी हवी तशी साधनं नाहीत, तरीही एका हातमजुरी करणाऱ्या वडिलांच्या लेकीने चक्क तीन स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारली आहे. धोर्तडी येथील मोनाली आठवले हिचा हा प्रवास संघर्षातून यशाकडे कसा पोहोचला, हे जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.
वडील नळ फिटिंगचे मजूर, तर आई शेतमजूर
मोनालीचे वडील दीपक आठवले हे अल्पभूधारक शेतकरी असून कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी ते गावात नळ फिटिंग आणि मजुरीची कामे करतात. आई देखील शेतात कष्ट करून मोनालीच्या शिक्षणाला हातभार लावते. अशा हलाखीच्या परिस्थितीत मोनालीने केवळ जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. घरची परिस्थिती बेताची असल्याने ट्युशन लावणं शक्य नव्हतं, पण मोनालीने हार मानली नाही आणि घरातच अभ्यासाचे मैदान उभारले.
एकाच वेळी 3 परीक्षांमध्ये घवघवीत यश
मोनालीने केवळ अभ्यासच केला नाही, तर एकामागून एक तब्बल 3 सरकारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. समाजकल्याण विभागात लिपिक, उच्च न्यायालयात बेलीफ आणि विक्रीकर विभागात टॅक्स असिस्टंट अशा तीनही पदांसाठी तिची निवड झाली आहे. यापैकी तिने 'टॅक्स असिस्टंट' म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मोनालीने एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण शिष्यवृत्तीच्या जोरावर पूर्ण केले आहे.
( नक्की वाचा : Amravati News: अमरावतीमध्ये चायनीजच्या गाड्यांवरून लव्ह जिहादाचा कट? भाजपा खासदारांच्या 5 मोठ्या मागण्या )
काय आहे मोनालीचं स्वप्न?
टॅक्स असिस्टंट म्हणून अधिकारी बनल्यानंतरही मोनाली येथेच थांबणार नाहीये. तिचे पुढचे ध्येय 'असिस्टंट कमिशनर' होण्याचे आहे. फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अभ्यास केला, तर यश नक्की मिळते, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करता येते, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
मोनालीच्या या विलक्षण यशाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी तिच्या घरी जाऊन तिचे आणि तिच्या पालकांचे कौतुक केले. एका मजुराची मुलगी जेव्हा अधिकारी बनते, तेव्हा तो आनंद संपूर्ण गावाचा असतो, हेच दृश्य सध्या धोर्तडी गावात पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world