Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला अष्टलक्ष्मी पूजा का करावी? लक्ष्मीमातेची 8 दिव्य रुप व महत्त्व जाणून घ्या

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अष्टलक्ष्मीची पूजा का करावी? माता लक्ष्मीच्या 8 दिव्य स्वरूपांचे महत्त्व आणि त्यांची पूजा केल्यास कोणते लाभ मिळू शकतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ashta Laxmi Puja Benefits: अष्टलक्ष्मीच्या पूजेचे लाभ"
NDTV

Akshaya Tritiya 2026: जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशांची आवश्यकता असते. पैसा कमावण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने कष्ट, प्रयत्नांसह लक्ष्मीमातेची पूजा देखील करतात. पण केवळ धनाने सर्व सुख मिळत नाही. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये माता लक्ष्मीच्या आठ दिव्य स्वरूपांची, म्हणजेच 'अष्टलक्ष्मी'ची पूजा करण्याचे महत्त्व सांगितलंय. हिंदू धर्मात अष्टलक्ष्मी पूजेचे महत्त्व काय आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने व्यक्तीला कोणते पुण्यफळ मिळते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अष्टलक्ष्मीचे 8 दिव्य रुप आणि त्यांचे महत्त्व | Ashtlakshmi Importance

  1. आदिलक्ष्मी: माता लक्ष्मीचे हे पहिले स्वरूप चार भुजांचे आहे. या स्वरूपाची विधीवत पूजा केल्यास भाविकाला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. आदिलक्ष्मी आपल्या साधकाला धन, धर्म आणि मोक्ष प्रदान करते.
  2. धनलक्ष्मी: लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या या देवीचे सहा हात आहेत. या रुपात देवीमातेने चक्र, शंख, अमृतकलश, धनुष्य-बाण आणि कमळ धारण केले आहे. माता लक्ष्मीच्या या कृपेने भाविकाला कधीही धनाची कमतरता भासत नाही.
  3. धान्यलक्ष्मी: अष्टभुज असलेल्या धान्यलक्ष्मी माता आपल्या भाविकाला धनाच्या जोडीला धान्याचे (अन्नाचे) सुख प्रदान करतात. ज्या घरात यांची साधना होते, तिथे अन्नाची कमतरता कधीही नसते.
  4. गजलक्ष्मी: हत्तीवर स्वार असलेली लक्ष्मीचे हे स्वरूप भाविकाला राजसुख प्रदान करते. यांच्या पूजेने सत्ता-सरकारमध्ये यश आणि पद मिळते, तसेच शेतकऱ्यांना उत्तम शेतीचे वरदान लाभते.
  5. संतानलक्ष्मी: सहा हात असलेल्या या देवीच्या पूजेने भाविकाला सुंदर आणि गुणी संतती प्राप्त होते. माता लक्ष्मीच्या या स्वरूपाची पूजा सुखी-संपन्न परिवाराचा आशीर्वाद देते.
  6. वीरलक्ष्मी: वीर लक्ष्मी हे माता कात्यायनीचे स्वरूप मानले जाते. या देवीची पूजा केल्यास भाविकाला आयुष्यातील संकटांशी लढण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो. तसेच अकाली मृत्यूचे भय सतावत नाही.
  7. विजयलक्ष्मी: नावाप्रमाणेच ही देवी आपल्या भाविकाला विजयाचा आशीर्वाद देते. माता लक्ष्मीच्या या स्वरूपाची पूजा केल्यास कोर्टाच्या प्रकरणांत यश प्राप्त होते, असे म्हणतात.
  8. विद्यालक्ष्मी: विद्यालक्ष्मीची विधीवत पूजा केल्यास भाविकाला बुद्धी, विवेक आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. त्यांच्या कृपेने व्यक्ती विविध कलांमध्ये पारंगत होऊन धन आणि यश मिळवते, अशी श्रद्धा आहे.

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026 Wishes 25+: धन-धान्याची व्हावी समृद्धी, आरोग्य लाभो निरोगी; अक्षय्य तृतीयेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)