Angarki Chaturthi 2026: सूर्यग्रहणासमान लाभ देणारा विशेष योग;पंचांगकर्त्यांनी सांगितले अक्षय फलप्राप्तीचा उपाय

Angarki Chaturthi 2026: 5 मे 2026 रोजी येणारी अंगारकी चतुर्थी सूर्यग्रहणासमान पुण्य देणारी आहे. पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सोशल मीडियाद्वारे या दिवशी कोणते उपाय करावे, याबाबत माहिती दिलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Angarki Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीचा विशेष योग"
Canva

Angarki Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थी केवळ गणपती उपासनेसाठीच नाही, तर पितरांसाठीचे कार्य आणि दानधर्मासाठीही अत्यंत दुर्मीळ आणि फलदायी मानली जात आहे. पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती ग्रंथांमध्ये या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व वर्णन करण्यात आले असून, हा दिवस सूर्यग्रहणासमान पुण्य प्राप्त करून देणारा ठरणार आहे. यंदा 5 मे रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. जाणून घेऊया पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेली माहिती...

काय सांगते शास्त्र?

गौरव देशपांडे यांनी शास्त्रातील एका श्लोकाचा संदर्भ देत या तिथीचे महत्त्व स्पष्ट केले आहे:
अमावस्या तु सोमेन सप्तमी भानुना सह ।
चतुर्थी भूमिपुत्रेण सोमपुत्रेण चाष्टमी ॥
चतस्त्रस्तिथयो स्त्वेताः सूर्यग्रहण सन्निभाः ।
स्नानं दानं तथा श्राद्धं सर्वं तत्राक्षयं भवेत् ॥

Advertisement

याचा अर्थ असा की, सोमवारी येणारी अमावस्या (सोमवती अमावस्या), रविवारी येणारी सप्तमी (भानुसप्तमी), बुधवारी येणारी अष्टमी आणि मंगळवारी येणारी चतुर्थी (अंगारकी चतुर्थी) या चार तिथी अतिशय पवित्र आहेत. या तिथींना केलेले कोणतेही धार्मिक कार्य हे सूर्यग्रहणाच्या काळात केलेल्या कार्याइतकेच मोठे पुण्य मिळवून देते.

अक्षय फलप्राप्तीसाठी करा 'ही' कामे

5 मे रोजी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला केवळ गणपतीचे व्रत किंवा उपवास करणे पुरेसे नाही. या दिवशी तीर्थस्नान (पवित्र नद्यांमध्ये स्नान), गरजूंना दानधर्म आणि आपल्या पितरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्राद्ध कर्म केल्यास त्याचे 'अक्षय' फळ मिळते. म्हणजेच या दिवशी केलेले पुण्य कधीही क्षय पावत नाही.

गणेश भक्तांसाठी हा दिवस जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो अध्यात्मिक प्रगती आणि पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठीही एक मोठी संधी आहे. त्यामुळे 5 मे 2026 रोजी येणाऱ्या या दुर्मीळ योगाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी केले आहे.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)