डॉ.जगन्नाथ दीक्षित
अध्यक्ष, अडोर ट्रस्ट, पुणे
भारतातील मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इंडिअन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार भारतात 20 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 11.5 % व्यक्ती मधुमेही आहेत तर सुमारे 15 % मधुमेह पूर्व अवस्थेत आहेत. 28 % लोक लठ्ठ तर 35 % लोकांना उच्च रक्तदाब आहे. निश्चितच ही परिस्थिती चिंताजनक आहे. बारकाईने बघितल्यास लक्षात येते की उपरोक्त सर्व आजारांच्या मागे बिघडलेली जीवनशैली हे कारण आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्यायामाचा अभाव, जास्त उर्जांक असलेला आहार, जास्त साखर-मीठ-तेल/तूप असलेले पदार्थ खाणे, झोपेचे बिघडलेले तंत्र आणि दैनंदिन जीवनातील ताण तणाव ह्या सगळ्या घटकांमुळे हे सर्व आजार जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. जीवनशैली बिघाड हे जर आपल्या रोगांचे मूळ असेल तर त्यावर जीवनशैली सुधार हेच उत्तर असणार हेच तर्कसंगत आहे! दुर्दैवाने या रोगांचे उत्तर अनेक तज्ञ औषधांमध्ये शोधत आहेत.
मधुमेह बरा होत नाही पण...
कै.डॉ.श्रीकांत जिचकार यांच्यापासून प्रेरणा घेऊन गेल्या बारा वर्षांपासून आम्ही “स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व” अभियान राबवत आहोत. इतक्या वर्षांच्या अनुभवातून मी खात्रीने सांगू शकेन की दीक्षित जीवनशैलीचा प्रामाणिकपणे अंगीकार केल्यास नुकतेच मधुमेहाचे निदान झालेल्या बहुतांश व्यक्ती 5 ते 6 महिन्यात रेमिशनच्या अवस्थेत जाऊ शकतात.
दीक्षित जीवनशैलीचे तत्व
शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाचे प्रमाण वाढले की आपण लठ्ठ होतो, आपल्याला इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो आणि मग टाईप-2 प्रकारचा मधुमेह होतो. हे इन्सुलिन आपल्या स्वादुपिंडात दोन प्रकारे तयार होते. पहिल्या प्रकारात 24 तास स्वादुपिंडातून थोडे थोडे इन्सुलिन स्त्रवत राहते. हे जवळपास 18 ते 32 युनिट एव्हढे असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. इन्सुलिन निर्मितीचा दुसरा मार्ग म्हणजे जेव्हा जेव्हा आपण काही खातो त्या प्रत्येक वेळी इन्सुलिन तयार होते. अशा प्रकारे निर्माण होणारे इन्सुलिन दिवसात 18 ते 32 युनिट असावे अशी अपेक्षा आहे.
( नक्की वाचा : उपाशी राहणाऱ्यांनाही मधुमेहाचा होण्याचा धोका )
या प्रकारे निर्माण होणाऱ्या इन्सुलिनची तीन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे प्रत्येक वेळी खाल्ले की एका विशिष्ट प्रमाणात इन्सुलिन तयार होते. दुसरे म्हणजे कमी खा किंवा जास्त खा प्रत्येक वेळी जवळपास सारखेच इन्सुलिन निर्माण होते. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे एकदा इन्सुलिन निर्माण झाल्यांनतर ते पुन्हा निर्माण व्हायला सुमारे 55 मिनिटांचा कालावधी लागतो. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढले तर वजन वाढते, चरबीचा संचय होतो, रक्तदाब वाढतो, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढते, रक्त वाहिन्या काठीण्य वाढते, हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, इन्सुलिन रेझिस्तंस/प्रतिरोध वाढतो आणि मधुमेह होतो यावर जगातील डॉक्टरांचे एकमत आहे.
आपले प्रश्न जर वाढलेल्या इन्सुलिन मुळे निर्माण झालेले असतील तर इन्सुलिनचे प्रमाण कमी करणे हाच त्यावर उपाय असायला हवा. आपण इन्सुलिन कसे तयार होते ते समजून घेतले आहे. इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यासाठी म्हणूनच खाण्याच्या वारांवारातेकडे (frequency) लक्ष द्यायला हवे. दीक्षित जीवनशैलीद्वारे आपण नेमके तेच साधत आहोत.
( नक्की वाचा : शरीरातील रक्तशर्करेची पातळी राहील नियंत्रणात, करा फक्त हे एक काम )
दीक्षित जीवनशैली नेमकी काय आहे?
- कडक भुकेच्या दोन वेळा ओळखून त्या दोन वेळी जेवा
- जेवण जास्तीत जास्त 55 मिनिटात संपवा...कमी वेळात संपले तरी चालेल
- जेवणातील कर्बोदकांचे प्रमाण कमी करा आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवा
- मधुमेह नसला तरी सुद्धा जेवणातील गोडाचे प्रमाण कमी करा. मधुमेह असल्यास मुळीच खाऊ नका
- दिवसात सलग 45 मिनिटे हृदयगती वाढणारा व्यायाम करा. 4.5 किलो मीटर चाला किंवा 12-15 किमी सायकल चालवा. 45 सूर्यनमस्कार घातले तरी चालतील.
ही जीवनशैली कोणी करू नये?
- 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती
- गरोदर आणि स्तनदा माता (मूल 9 महिन्याचे होईपर्यंत
- टाईप-1 मधुमेहाचे रुग्ण
या जीवनशैलीमुळे होणारे मुख्य फायदे
- सहा महिन्यात सरासरी 6.8 किलो वजन कमी होते
- सहा महिन्यात सरासरी 1.5 इंच पोट कमी होते
- HbA1c कमी होते
- उपाशीपोटचे इन्सुलिन कमी होते
दीक्षित जीवनशैलीत जेवतांना काय खावे आणि दोन जेवणाच्या मधल्या वेळात काय खावे?
त्यासाठी आपल्याला माहित हवे की आपण मधुमेह मुक्त आहोत, मधुमेह पूर्व अवस्थेत आहोत की मधुमेही आहोत. यासाठी HbA1c आणि fasting insulin या तपासण्या करणे गरजेचे आहे.
मधुमेह मुक्त व्यक्ती: मधुमेहासाठी औषध नाही, HbA1c ५.६ ग्राम % पर्यंत आणि fasting insulin 10 पर्यंत
मधुमेह पूर्व अवस्थेतील व्यक्ती: मधुमेहासाठी औषध नाही, HbA1c 5.7 ते 6.4 ग्राम % पर्यंत आणि/किंवा fasting insulin १० पेक्षा जास्त
मधुमेही व्यक्ती: मधुमेहासाठी औषध घेते किंवा HbA1c 6.5 ग्रॅम % किंवा त्याहून जास्त
मधुमेह नसलेल्या व्यक्तींनी काय खावे?
जेवणाच्या सुरुवातीला फळ/सुका मेवा/ खाणार असल्यास गोड पदार्थ खावा. त्यानंतर वाटीभर सलाड खावे. त्यानंतर तेव्हढीच वाटी भरून मोड आलेले कडधान्य किंवा दोन उकडलेली अंडी खावी. मग घरात बनलेले किंवा खायला मिळतील ते पदार्थ खावे.
दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास पाणी, घरी बनवलेले पातळ ताक, कोणताही फ्लेवर नसलेला ग्रीन/ब्लाक टी किंवा ब्लाक कॉफी किंवा 25% दुध आणि 75% पाणी असलेला चहा/कॉफी (कशातच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकू नये) हे सर्व पदार्थ कितीही वेळा कितीही प्रमाणात घेता येतील. दिवसातून एकदा शहाळ्याचे पाणी किंवा एक टोमाटो खाता येईल.
मधुमेही आणि मधुमेह पूर्व अवस्थेतील व्यक्तींनी काय खावे?
मधुमेही आणि मधुमेह पूर्व अवस्थेतील व्यक्तींनी जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम आणि चार अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खावे. त्यानंतर वाटीभर सलाड खावे. यात गाजर आणि बीट खाऊ नये. त्यानंतर तेव्हढीच वाटी भरून मोड आलेले कडधान्य किंवा दोन उकडलेली अंडी खावी. मग घरात बनलेले किंवा खायला मिळतील ते पदार्थ खावे.
गोड आणि फळे पूर्णपणे बंद करावीत. दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास पाणी, घरी बनवलेले पातळ ताक, कोणताही फ्लेवर नसलेला ग्रीन/ब्लाक टी किंवा ब्लाक कॉफी (कशातच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकू नये) हे सर्व पदार्थ कितीही वेळा कितीही प्रमाणात घेता येतील. 25% दुधाचा पातळ चहा/कॉफी, शहाळ्याचे पाणी किंवा टोमॅटो मात्र खाता येणार नाही.
आम्ही काय शिकलो?
1) मधुमेहाचे निदान लवकर होत नाही
गेल्या काही वर्षात आम्ही विविध आस्थापनांसाठी मधुमेह मुक्ती कार्यक्रम राबवले आहेत. भिलवडीच्या डेअरीतील कर्मचारी, हुपरीच्या एका चांदी उद्योगातील कर्मचारी आणि गुजरात राज्याच्या सोमनाथ गिर जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या अभ्यासातून आमच्या लक्षात आले की एचबीएवनसी तपासणी केल्याने मधुमेह असल्याचे माहित असलेले लोक सोडून किमान 30% इतर व्यक्तींना त्या मधुमेह पूर्व अवस्थेत आहेत किंवा मधुमेही आहेत हे समजले!
मधुमेहाचे निदान लवकर न होण्याचे मुख्य कारण म्हणजे 50% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. दुसरे कारण म्हणजे मधुमेहाच्या निदानासाठी फक्त रक्त शर्करा या तपासणीचा वापर करणे.
2) मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक औषधोपचार केले जातात
मधुमेह उपचारांच्या सर्व मार्गदर्शक तत्वांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांना औषधे देण्यापूर्वी जीवनशैली बदलाचा सल्ला द्यावा असे सांगितले आहे. आम्ही केलेल्या एका अभ्यासात असे लक्षात आले की 50% रुग्णांना ज्या दिवशी मधुमेहाचे निदान झाले त्याच दिवशी औषधे सुरु करण्यात आली!
हा अभ्यास आम्ही आमच्या अभियानातील जीवनशैलीबाबत जागरूक असणाऱ्या रुग्णांचा केला होता त्यामुळे प्रत्यक्षात हे प्रमाण यापेक्षा नक्कीच जास्त असेल. असे का घडते याचे उत्तर सध्या सुचवल्या जाणाऱ्या जीवनशैलीवर, ती सुचवणारे डॉक्टर आणि ज्यांनी ती अंगीकारायला हवी ते रुग्ण या दोहोंचाही विश्वास नाही हे आहे! सध्या सांगितली जाणारी जीवनशैली म्हणजे व्यायाम करा आणि दर तीन चार तासाला खा.
या जीवनशैलीचा अंगीकार करून कोणत्या मधुमेही रुग्णाचे औषध कमी झाले का किंवा कमीबंद झाले का याचा शोध वाचकांनी जरूर घ्यावा. कारण घराघरात मधुमेहाचे रुग्ण आहेत. तुमच्या लक्षात येईल की अशी जीवनशैली अंगिकारणाऱ्या रुग्णांची औषधे दिवसेंदिवस वाढतच जातात. ही जीवनशैली मधुमेहाच्या नियंत्रणासाठी अपयशी ठरली आहे हे सांगण्यासाठी खरे तर कोणत्याही संशोधनाची आवश्यकता नाही. औषधोपचार घेणारा मधुमेहाचा प्रत्येक रुग्ण आणि अनेक मधुमेह तज्ञांच्या मधुमेह रुग्णांच्या नोंदी हेच त्याचे मोठे पुरावे आहेत!
( नक्की वाचा : Diabetes and Sugar Level : किती असावी शुगर लेव्हल ? वाचा, कोणती टेस्ट आहे सर्वोत्तम )
3) जीवनशैली बदलाचा सल्ला देण्यासाठी केवळ रक्त शर्करा किंवा एचबीएवनसी या पेक्षा वाढलेल्या रक्त शर्करेमुळे विविध इंद्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींना जास्त महत्व द्यायला हवे.
मधुमेहामध्ये रक्त शर्करा किंवा एचबीएवनसी किती आहे या पेक्षा वाढलेल्या रक्त शर्करेमुळे मूत्रपिंड, दृष्टीपटल, हृदय, यकृत किंवा मज्जातंतू या इंद्रियांवर त्याचे काही दुष्परिणाम झाले आहेत का ह्याचे जास्त महत्व असते. एखाद्याचे एचबीएवनसी आज १० आहे याचा अर्थ ते तसे एका रात्रीत झालेले नाही! किमान मागचे तीन महिने ते वाढलेले होते. कदाचित 6 ते 12 महिने ते वाढलेलेच होते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये जीवनशैलीचा सल्ला देण्यापूर्वी उपरोक्त इंद्रियांवर काही दुष्परिणाम झाला आहे की नाही हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते. रक्त शर्करा अमुक एका पातळीवर इतके दिवस असेल तर त्याचा किती दिवसात कोणत्या इंद्रियावर काय दुष्परिणाम होतो या विषयी खात्रीशीर पुरावा उपलब्ध नाही!
4) हायपोग्लायसेमिया (अर्थात रक्तातील शर्करा कमी होणे) ही मधुमेहाची औषधे कमी करण्याची संधी आहे अनेकदा दीक्षित जीवनशैली मधुमेही रुग्णांनी का अंगिकारू नये यासाठी “त्यामुळे हायपो ग्लाय्सिमिया होईल” असे कारण पुढे केले जाते. वस्तुस्थिती अशी आहे की मधुमेहासाठी औषधे घेणाऱ्या प्रत्येक मधुमेह्याला हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असतेच! कारण औषधे दिल्याने रक्तातील साखर कमी केली जाते. म्हणून मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाने हायपो ग्लायसेमियाची काळजी न करता त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णाच्या घरी ग्लुकोमीटर असायलाच हवे.
आम्ही अभियानात सांगतो की जर हात पाय थरथरणे, अचानक घाम येणे, छातीत धडधडणे, डोळ्यापुढे अंधारी येणे असा त्रास झाला तर रक्तातील साखर मोजा आणि ती 80 पेक्षा कमी असेल तर गोड खा. सध्या काय घडते ते बघू. जर रुग्ण दुपारी बारा वाजता ग्लीमिप्राईड 1 मिग्रा घेत असेल आणि त्याला चार वाजता हायपोग्लायसेमिया झाला तर तो घाबरून डॉक्टरांना फोन करतो. साहजिकच डॉक्टर त्याला गोड खायला सांगतात. ते योग्यच आहे कारण हायपोग्लायसेमिया ही गंभीर गोष्ट असू शकते. आता रुग्णाची मानसिकता समजावून घेऊ.
दुसऱ्या दिवशी दुपारी साडे तीन पासूनच रुग्ण हायपोग्लायसेमियाची वाट पाहत असतो! काही मिनिटे त्याचा संयम टिकतो आणि मग हायपोग्ल्यायसेमिया होण्याच्या आधीच तो गोड खातो. असेच रोज करतो. मग डॉक्टरकडे गेल्यावर साखर आणि एचबीएवनसी वाढलेले असतात. मग अजून औषधे दिली जातात. त्याची परिणती अजून हायपोग्लायसेमिया आणि अजून गोड खाणे आणि अजून औषधे अशा दुष्टचक्रात होते.
आमच्या केंद्रामध्ये अशा वेळी डॉक्टर रुग्णांचा ग्लीमीप्राईड औषधाचा डोस 0.5 मिलीग्राम असा कमी करतात. परत हायपो व्हायला लागला तर ते औषध बंद करतात. अशाच पद्धतीने रुग्णांची औषधे कमी होतात किंवा बंद होतात.
5) एचबीएवनसी कमी होण्यासाठी किंवा मधुमेहात सुधारणा होण्यासाठी वजन कमी करणे अनिवार्य नाही
वजन 10% कमी करा म्हणजे एचबीएवनसी कमी होईल किंवा मधुमेह नियंत्रणात येईल असे सामान्यपणे सांगितले जाते. आमच्या असे लक्षात आले की काही मधुमेही लठ्ठ नाहीतच. काही मधुमेह्यांचे वजन अनियंत्रित मधुमेहामुळे किंवा औषधांच्या परिणामामुळे कमी झालेले असते. दीक्षित जीवनशैलीचा अंगीकार करून मधुमेह नियंत्रणात आला तर त्यांचे वजन वाढते! अर्थात ज्यांचे वजन जास्त आहे त्यांचे कमी होईलच.
मधुमेहाबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल होण्याची आवश्यकता आहे !
मधुमेहावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मधुमेह हा कधीही बरा न होणारा आजार वाटत असेल तर रुग्णासाठी त्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे रुग्णाला हायपोग्लायसेमिया होऊ नये यासाठी वारंवार खाण्याचा सल्ला द्यावा लागतो. दुसरे म्हणजे रुग्णाची रक्त शर्करा खूप वाढू नये यासाठी 24 तास त्याला औषधांच्या नियंत्रणात ठेवावे लागते!
मधुमेह उपचारासाठीच्या सर्व गाईडलाईन्स सुरुवातीला जीवनशैली बदल सुचवा असे सांगत असल्या तरी बहुतांश रुग्णांमध्ये निदान झाल्याबरोबर लगेचच औषधे सुरु केली जातात. याचे कारण म्हणजे जीवनशैली सुचवणारे डॉक्टर आणि ज्यांना ती सुचवली जाते ते रुग्ण या दोहोंचाही सध्या सुचवल्या जाणाऱ्या जीवनशैलीवर विश्वास नाही! दिवसातून अनेक वेळा खाणे ही जीवनशैली मधुमेहामध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहे यासाठी कोणतेही संधोधन करायची गरज नाही. औषधे घेणारा प्रत्येक मधुमेही आणि मधुमेह तज्ञाचे आजवरचे रेकॉर्ड त्याची साक्ष आहेत.
जर सध्या सुचवल्या जाणाऱ्या जीवनशैलीचा फायदा होत नसेल तर ज्या दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून शेकडो मधुमेह्यांनी औषधे न घेता मधुमेहावर नियंत्रण मिळवले आहे त्याचा अंगीकार करण्यास काय हरकत आहे?