केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी दरातील कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः दुचाकींच्या बाजारपेठेत सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. मागील आठवड्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील करांचे दर सुधारित करण्यात आले. या नवीन निर्णयानुसार, विविध वस्तूंसाठी 5% आणि 18% अशा दोन टप्प्यांतील जीएसटी रचना लागू करण्यात आली आहे, जी सध्याच्या चार टप्प्यांच्या संरचनेपेक्षा अधिक सोपी आणि प्रभावी आहे. हे नवे दर 22 सप्टेंबरपासून देशभरात लागू होतील.
नक्की वाचा: GST कर बदलांमुळे कोणती कार किती रुपयांनी होणार स्वस्त? किती पैसे वाचतील, पाहा यादी
350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाईक स्वस्त होणार
जीएसटी दरांमधील या बदलामुळे 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकी आता अधिक स्वस्त होणार आहेत. या दुचाकींवरील जीएसटी दर 28% वरून थेट 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या अंतिम किमतीत लक्षणीय घट होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी अजूनही या कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नसला तरी, येत्या काही दिवसांत कंपन्या किंमती कमी करून ही सूट ग्राहकांना देतील अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ होऊन संपूर्ण दुचाकी बाजारपेठेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण, निमशहरी भागातील लोकांना होईल अधिक फायदा
या निर्णयाचा ग्रामीण आणि निमशहरी भागांतील जनतेला विशेष फायदा होणार आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "जीएसटी कमी झाल्यामुळे दुचाकींच्या किमती कमी होतील, ज्यामुळे त्या तरुण, व्यावसायिक आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अधिक सुलभ होतील. ग्रामीण आणि निमशहरी भारतात दुचाकी हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे स्वस्त दुचाकींचा थेट फायदा शेतकरी, लहान व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना होईल."
नक्की वाचा: दारुवर किती टॅक्स? सिगारेट-तंबाखूपासून कोल्ड्रिंक्स चाहत्यांना मोठा झटका, GST चा खिशावर काय परिणाम होईल?
जीएसटी कपातीनंतर कोणती मॉडेल स्वस्त होणार ?
- या जीएसटी कपातीमुळे अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती कमी होणार आहेत.
- बजाज प्लॅटिना 110 (Bajaj Platina 110) ज्याची सध्याची किंमत 71,558 रुपये आहे, ती 66,007 रुपयांवर येण्याची शक्यता आहे.
- टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) आधीच घोषणा केली आहे की, ते कमी झालेल्या किमतीचा पूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. याचा अर्थ त्यांच्या लोकप्रिय टीव्हीएस रायडर 125 (TVS Raider 125) या मॉडेलच्या किमतीत सुमारे 8,000 रुपयांची कपात होईल, ज्यामुळे त्याची किंमत 96,000 रुपयांपर्यंत खाली येईल.
- तसेच, हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) 5,683 रुपयांनी स्वस्त होण्याची अपेक्षा आहे, ज्याची सध्याची किंमत 67,867 रुपये आहे.
हिरो, होंडा, बजाजच्या बाईकच्या किंमती किती कमी होणार ?
मॉडेलचे नाव | इंजिन क्षमता | सध्याचा जीएसटी (28% GST) | अपेक्षित जीएसटी (18% GST) | किंमत किती कमी होईल? |
Hero Splendor Plus | 97.2cc | Rs 79096 | Rs 72516 | Rs 6580 |
Honda Shine 125 | 123.94cc | Rs 84493 | Rs 77457 | Rs 7036 |
Bajaj Pulsar 124 | 124.4 cc | Rs 104871 | Rs 96306 | Rs 8565 |
Yamaha FZ-S Fi | 149cc | Rs 135190 | Rs 124743 | Rs 10447 |
Honda CB Shine SP | 124.7cc | Rs 164250 | Rs 151389 | Rs 12861 |
Bajaj Platina 110 | 115.45cc | Rs 71558 | Rs 66007 | Rs 5551 |
TVS Raider 125 | 124.8cc | Rs 104000 | Rs 96000 | Rs 8000 |
Hero HF Deluxe | 97.2cc | Rs 73550 | Rs 67867 | Rs 5683 |
Yamaha Saluto RX | 110cc | Rs 70000 | Rs 64583 | Rs 5417 |
Hero Glamour X 125 | 124.7cc | Rs 105024 | Rs 96024 | Rs 9000 |
Honda CB 125 Hornet | 123.94cc | Rs 129205 | Rs 121365 | Rs 7840 |
केंद्र सरकारच्या मते, ऑटो उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग, विक्री आणि देखभाल यांसारख्या क्षेत्रांमध्ये 3.5 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देतो. मागणी वाढल्यास डीलरशिप, लॉजिस्टिक्स, वाहतूक सेवा आणि सुटे भाग पुरवणाऱ्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये (MSMEs) नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निर्णय केवळ ग्राहकांना आर्थिक फायदा देणारा नसून, तो देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा आहे. दुचाकींच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढेल आणि 'मेक इन इंडिया' सारख्या उपक्रमांना बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.