- बर्मीज अजगराच्या रक्तात असा विशेष रेणू आढळला आहे जो लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषध बनू शकतो.
- अजगराच्या रक्तातील pTOS नावाचा रेणू अन्नानंतर झपाट्याने वाढून चयापचय नियंत्रित करतो.
- pTOS रेणूची चाचणी उंदरांवर केली असता त्यांच्या वजनात 28 दिवसांत सुमारे 9 टक्क्यांची घट झाली.
Python Blood Obesity Benefits: आजच्या काळात लठ्ठपणा ही संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएट, जिम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा आधार घेतात, पण दीर्घकाळापर्यंत या सर्व गोष्टींचा परिणाम टिकवून ठेवणे कठीण होते. दरम्यान एका नवीन संशोधनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, बर्मीज अजगराच्या (Burmese Python) रक्तात (Blood) एक असा विशेष रेणू (Molecule) आढळला आहे, जो भविष्यात लठ्ठपणा (Obesity) कमी करणारे औषध बनू शकतो. जरी हे संशोधन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असले, तरी त्याचे परिणाम खूप रंजक सांगितले जात आहेत.
अजगरावरील संशोधनामुळे खास गोष्ट आली समोर
अजगर आपल्या खाण्याच्या अनोख्या सवयींसाठी ओळखला जातो. तो आपल्या शरीराएवढ्या मोठ्या शिकारीला गिळू शकतो आणि त्यानंतर अनेक महिने न खाता-पिता राहू शकतो. शास्त्रज्ञांनी त्याची हीच विशेष क्षमता समजून घेण्यासाठी त्याच्या रक्ताचा अभ्यास केला. संशोधनात असे आढळून आले की, अन्न खाल्ल्यानंतर अजगराच्या रक्तातील काही खास रेणूंचे (Molecules) प्रमाण झपाट्याने वाढते. हेच रेणू त्याच्या शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) नियंत्रित करण्यास मदत करतात.
कसा काम करतो हा रेणू?
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या संशोधनात 200 हून अधिक रेणूंची ओळख पटवली. यापैकी एक रेणू, ज्याला pTOS म्हटले जाते, तो सर्वात जास्त प्रभावी आढळला. अन्न खाल्ल्यानंतर याचे प्रमाण 1000 पटीने वाढले. या रेणूची चाचणी लठ्ठ उंदरांवर करण्यात आली. चाचणीदरम्यान असे आढळले की, उंदरांनी कमी अन्न खाण्यास सुरुवात केली आणि सुमारे 28 दिवसांत त्यांच्या वजनात जवळपास 9 टक्क्यांपर्यंत घट झाली.
(नक्की वाचा: धक्कादायक! समुद्रातून आलेलं ते संकट तुमच्या डोळ्यांची दृष्टी हिरावून घेऊ शकतं, या VIRUSने जगाची वाढवली चिंता)
हे औषध सुरक्षित असेल का?
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा रेणू थेट मेंदूच्या त्या भागावर परिणाम करतो जो भूक नियंत्रित करतो. याच कारणामुळे हे औषध पारंपरिक औषधांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. सध्या वजन कमी (Weight Loss Tips) करणारी जी औषधे आहेत, ती पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे बऱ्याचदा मळमळ किंवा उलट्या (Vomiting) यासारखे दुष्परिणाम (Side Effects) होऊ शकतात. पण या नवीन पद्धतीमध्ये असे दुष्परिणाम कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(नक्की वाचा : Osteoarthritis Treatment: गुडघ्यातून कटकट आवाज येतो? जिने चढताना त्रास होतो? डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा)
अद्याप अधिक संशोधन होणे बाकी
जरी हे संशोधन सध्या आशेचा किरण वाटत असला तरी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की हे संशोधन अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मानवावरील त्याचा परिणाम आणि सुरक्षिततेबाबत पुढे आणखी अभ्यास करणे गरजेचे आहे. अजगराच्या रक्ताशी संबंधित हा शोध लठ्ठपणा कमी करण्याच्या क्षेत्रात एक नवीन मार्ग खुला करू शकतो. जरी याचे औषध बनण्यासाठी वेळ लागणार असला, तरी भविष्यात हा एक मोठा बदल घडवून आणू शकतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)