Chandra Grahan Effect In India : फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी ३ मार्च २०२६ रोजी चंद्रग्रहण लागलं आहे. दुपारी ३.२० मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६.४८ मिनिटांपर्यंत ग्रहण संपेल असं सांगितलं जात आहे. आज धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे. यंदाचं ग्रहण साध्या डोळ्यांनीही पाहता येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. भारतातून हे चंद्रग्रहण दिसणार असल्याने सूतक काळातील सारे नियम लागू आहेत. चंद्रग्रहणात सूतक काळाची ९ तासांपूर्वी सुरुवात झाली.
१५ दिवसांच्या आत दुसरं ग्रहण, कुणासाठी धोक्याची घंटा?
१५ दिवसांच्या अंतरात दोन ग्रहणं येणे ही भारत आणि जगासाठी नकारात्मक बाब आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारीला सूर्यग्रहण झालं होतं आणि आता १५ दिवसांनी चंद्रग्रहण होत आहे. महाभारतातही असा उल्लेख आहे की, जेव्हा एकाच पंधरवड्यात दोन ग्रहणे लागतात, तेव्हा युद्धजन्य परिस्थिती किंवा मोठी नैसर्गिक संकटे ओढवतात.
भारतावर परिणाम (Chandra Grahan Effect In India)
हे ग्रहण देशात अंतर्गत अशांती निर्माण करू शकते. विविध धार्मिक संस्था, राजकीय पक्ष आणि समुदायांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या ईशान्य, उत्तर आणि दक्षिण-पश्चिम भागात भूकंप, चक्रीवादळ किंवा भूस्खलन यांसारख्या घटना घडू शकतात. अशी शक्यता काही ज्योतिषाचार्यांनुसार वर्तवली जात आहे. आगीच्या दुर्घटना, पोलीस दल आणि लष्करासाठी आव्हानात्मक काळ असू शकतो. ईशान्य भारतात बाहेरील संघटनांकडून काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. पूर्व किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा, सुनामी किंवा जल प्रलयामुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.
जागतिक स्तरावर होणारे परिणाम (Chandra Grahan Effect on World)
भारताच्या पश्चिमेकडील देश जसे की पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक आणि अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात अशांती निर्माण होऊ शकते. युद्धाची परिस्थिती आणि लष्करी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून पुढील ३ ते ६ महिने याचा प्रभाव राहील. ग्रहणाच्या वेळी कुंभ राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि राहू यांची युती असेल, तर सिंह राशीत केतू आणि चंद्राची स्थिती असेल. शनी आणि शुक्र मीन राशीत तर गुरु मिथुन राशीत विराजमान असतील. या ग्रहांच्या स्थितीमुळे अचानक मोठे निर्णय आणि अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. लाइव्ह हिंदुस्तानीने ज्योतिर्विद दिवाकर त्रिपाळी यांच्या नावे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
(NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)