युवकांसाठी मोठी संधी! डेल टेक्नॉलॉजीजच्या ‘उडान’मार्फत AI कोर्सेस, 23 हजार तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण

डेल टेक्नॉलॉजीजने (Dell Technologies) एफआयटीटी-आयआयटी दिल्ली, लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि जनरेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने **‘उडान’ (Udaan)** या नव्या राष्ट्रीय कौशल्याधारित उपक्रमाची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन डेल टेक्नॉलॉजीजने ‘उडान' या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली आहे. हा सार्वजनिक-खासगी भागीदारीवर (PPP Model) आधारित देशातील पहिलाच राष्ट्रीय उपक्रम असून, याद्वारे 23 हजार तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जातील. हा उपक्रम एफआयटीटी-आयआयटी दिल्ली (FITT-IIT Delhi), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि जनरेशन इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्याने राबवला जात आहे.

पुण्यासह 5 प्रमुख शहरांतील 190 संस्थांची निवड

डेल इंडिया एआय ब्लूप्रिंटवर आधारित हा उपक्रम असून पुणे, दिल्ली एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या 5 प्रमुख शहरांमध्ये राबवला जाईल. यासाठी देशातील 100 आयटीआय (ITI) आणि 90 उच्च शिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

एफआयटीटी-आयआयटी दिल्लीतर्फे एआय ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, क्लाउड डेव्हलपमेंट, असेंबली लाईन ऑपरेशन्स आणि फील्ड तंत्रज्ञ हे 4 विशेष अभ्यासक्रम शिकवले जातील. या अभ्यासक्रमांना 40 हून अधिक नामांकित कंपन्यांनी मान्यता दिली आहे.

स्टार्टअप्सना पाठबळ आणि नोकरीनंतरही मागोवा

'उडान' उपक्रमांतर्गत पहिल्याच वर्षात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन 25 डीप-टेक स्टार्टअप्स आणि आयटीआय विद्यार्थ्यांच्या सहभागातून 10 सूक्ष्म उद्योग उभारले जातील. डेलचे कर्मचारी विद्यार्थ्यांना 2000 तासांहून अधिक काळ मार्गदर्शन करतील. इतर संस्थांप्रमाणे केवळ प्रमाणपत्र देऊन न थांबता, तरुणांना नोकरी मिळाल्यानंतरही 3, 6, 12 आणि 24 महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या नोकरीतील स्थिरतेचा मागोवा घेतला जाईल.

डेल टेक्नॉलॉजीज इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनिष गुप्ता यांनी स्पष्ट केले की, "एआय आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात कुशल मनुष्यबळाची तफावत दूर करणे आणि शिक्षण ते रोजगारापर्यंतचा प्रवास सुलभ करणे हा 'उडान' उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे."


Topics mentioned in this article