Dhanteras 2025 Puja: प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी! दिवाळीची सुरूवात रमा एकादशीला सुरू होते, या दिवशी वसुबारस सण साजरा केला जातो. दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असलेला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवसाचे धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या फार मोठे महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते, असे सुप्रसिद्ध ज्योतिषी नरेंद्र धारणे यांनी सांगितले. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी धनाची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने व्यापारी वर्ग आपल्या वह्या-चोपड्यांची पूजा करतात आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'शुभ लाभ' लिहून नवीन चोपड्यांचा वापर सुरू करतात. धन-समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर भारतातही धनत्रयोदशी उत्साहाने साजरी केली जाते.
प्रदोषकाळातील पूजनाचे महत्त्व
धनत्रयोदशीला धनदेवतेची आणि लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा विशेष मुहूर्त असतो, तो म्हणजे प्रदोष काळ. प्रदोष काळात भगवान शंकराचीही पूजा केली जाते ,असे ज्योतिषी नरेंद्र धारणे यांनी सांगितले . प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचे पुढील दोन तास. या शुभ वेळेत धन्वंतरी भगवान आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. आधुनिक काळात अनेकजण आपल्याकडे असलेल्या धनासह क्रेडिट आणि डेबिट कार्डचीही पूजा करतात, असे धारणे यांनी सांगितले. सूर्यास्तानंतरच्या या दोन तासांच्या शुभ काळात गणेश, लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते. सर्वप्रथम गणेशपूजा करून त्यानंतर लक्ष्मीची पूजा होते. या पूजेसोबतच 'आरोग्यम् धनसंपदाम्' असे म्हणत आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरींचीही पूजा केली जाते.
(नक्की वाचा: Diwali 2025: दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता करताय? राहु-केतुची नकारात्मकता दूर करण्यासाठी 3 टिप्स)
खरेदीचे शुभ योग
दिवाळीचा हा कालखंड अत्यंत आनंदी मानला जातो आणि आश्विन वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. 'यजुर्वेदा'त सांगितल्यानुसार, आश्विन महिना हा लक्ष्मीचा मानला गेला आहे. त्यामुळे या महिन्यात केलेली कोणतीही खरेदी शुभ फल देणारी ठरते, असे शास्त्र सांगते. विशिष्ट मुहूर्तावर खरेदी केल्यास त्याचे शुभ परिणाम जीवनावर कायमस्वरूपी टिकतात, म्हणून 'मुहूर्तशास्त्राला' विशेष महत्त्व आहे. खरेदीसाठीचा असाच एक चांगला योग म्हणजे अमृतसिद्धी योग, हा योग दिवाळीत येतो त्यामुळे फार पूर्वीपासून दिवाळीतील खरेदीला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी सुवर्णासारखी दिसते, यामुळे प्रतीक म्हणून या दिवशी सोने खरेदीला महत्त्व आहे. आपण खरेदी केलेली वस्तू दीर्घकाळ लाभावी, टिकावी आणि लक्ष्मीचा वरदहस्त राहावा, याच उद्देशाने दिवाळीत खरेदी केली जाते. दक्षिण भारतात धनत्रयोदशीसोबतच अमावस्येला होणारे लक्ष्मीपूजनही महत्त्वाचे मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)