- धनतेरस पर्व पर उज्जैन के कुबेर मंदिर में देशभर से श्रद्धालु कुबेर भगवान की पूजा और आराधना के लिए आते हैं
- मंदिर में स्थापित कुबेर देवता की प्राचीन प्रतिमा स्वयं भगवान श्रीकृष्ण ने संदीपनी आश्रम में स्थापित की थी
- इस प्रतिमा का निर्माण मध्यकालीन शिल्पकारों ने बेसाल्ट पत्थर से किया है और यह लगभग एक हजार वर्ष पुरानी है
Dhanteras 2025: आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला 'धनत्रयोदशी' (Dhanteras 2025) साजरी केली जाते. या दिवशी धनाची देवता कुबेर यांचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे मध्य प्रदेश राज्यामधील उज्जैन शहरातील कुबेर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. संदीपनी आश्रमातील भगवान कुबेराची प्राचीन मूर्ती स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्थापित केली होती, असे म्हणतात.
कुबेर देवाचे कुण्डेश्वर महादेव मंदिर
उज्जैन शहरातील मंगलनाथ मार्गावर महर्षी संदीपनी यांचे आश्रम आहे, या आश्रमामध्ये भगवान श्री कृष्णा यांनी शिक्षण घेतले होते, असे म्हणतात. आश्रम परिसरात श्रीकृष्ण बलराम मंदिराजवळच 82 महादेवांपैकी 40 वे कुंडेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये भगवान कुबेराची प्राचीन मूर्ती विराजमान आहे. या मंदिराचे छत देखील अद्वितीय आहे, ज्याचा आकार श्री यंत्रासारखा आहे.
अत्तर लावल्यानं समृद्धी प्राप्त होते?
स्थानिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवाची पूजा करुन मूर्तीच्या नाभीवर अत्तर लावल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते. याच कारणामुळे देशभरातील भाविक धनत्रयोदशीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करतात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. धनत्रयोदशीनिमित्त मंदिरामध्ये दोन वेळा विशेष स्वरुपात आरती तसेच सुकामेवा, अत्तर, गोड पदार्थ आणि फळांचा नैवेद्य अर्पण केला जाईल. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नंदीची मूर्ती देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
कुबेर देवाच्या मूर्तीची ऐतिहासिक कहाणी
मंदिराचे पुजारी शिवांश व्यास यांनी मंदिरातील प्राचीन मूर्तीची कहाणी सांगत म्हटले की, जेव्हा भगवान श्रीकृष्ण महर्षी संदीपनी यांच्या आश्रमातून शिक्षण पूर्ण करून द्वारकेला परतणार होते, तेव्हा गुरूदक्षिणेसाठी कुबेर धन घेऊन आले होते. यावेळेस गुरुमातेने श्री कृष्णाला सांगितले की त्यांच्या मुलाला राक्षस शंकासुराने पळवून नेलंय आणि त्यांनी मुलाला राक्षसाच्या तावडीतून सोडवून आणण्याची गुरुदक्षिणा कृष्णाकडे मागितली. श्री कृष्णांनी गुरुंच्या मुलाची राक्षसाच्या तावडीतून सुटका केली आणि भगवान द्वारकेमध्ये परतले. या घटनेनंतर कुबेर देव आश्रमातच बसून राहिले. याच कारणामुळे कुबेर देवाची बसलेल्या स्थितीत मूर्ती या मंदिरात आहे.
कुबेर देवाची मूर्ती किती वर्षे जुनी आहे?
पुजारी व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुबेर देवाची मंदिरातील मूर्ती मध्य युगातील आहे, ही मूर्ती अंदाजे 800 ते 1100 वर्षे जुनी आहे. शंगु काळातील शिल्पकारांनी ही मूर्ती साकारली होती. मूर्तीची उंची सुमारे 3.5 फूट उंच आहे.
देशामध्ये केवळ तीन ठिकाणी कुबेर देवाचे मंदिर
पुजारी व्यास यांच्या माहितीनुसार, उत्तर भारत, दक्षिण भारत आणि मध्य भारतातील उज्जैन शहर या तीनच ठिकाणी कुबेर देवाचे मंदिर आहे. म्हणून उज्जैन शहरातील कुबेर देवाचे मंदिर अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.
(नक्की वाचा: Happy Dhanteras 2025 Wishes: तुमचे भाग्य उजळो, महालक्ष्मी मातेची कृपा होवो; धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)