Sanitary Pads Disposal: सॅनिटरी पॅड्ससह कालबाह्य औषधांबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, करणार हे काम

Sanitary Pads Disposal: मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी गृहनिर्माण संस्था, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह इत्यादींना 22 एप्रिल 2025 पासून नोंदणी करता येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sanitary Pads Disposal: वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी इत्यादी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छताविषयक बाबींच्या संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने 'घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन' (Domestic Sanitary and Special Care Waste Collection) सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था इत्यादी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येईल. यासाठी संबंधित आस्थापनांना रितसर नोंदणी करावी लागेल. नोंदणीची प्रक्रिया 22 एप्रिल 2025 पासून कार्यान्वित करण्यात आलीय, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 
या उपक्रमाबाबत उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये सध्या रोज सुमारे सात ते आठ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी 70 ते 80 टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित (Sanitary Waste) असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस तसेच लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले बँडेजेस, कालबाह्य औषधे आणि ब्युटी पार्लरमध्ये निर्माण होणारा कचरा आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्यामुळे कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी क्लिष्टता निर्माण होते. 

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Dixit Diet : दीक्षित जीवनशैली म्हणजे काय? या पद्धतीनं लठ्ठपणा आणि मधुमेहावर मात कशी करता येते?)

याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन' सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा 1 मे 2025 पासून प्रत्यक्षात सुरू होईल. नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने 22 एप्रिल 2025 पासून नोंदणी प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृहे आणि शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येईल. सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल. मुंबईतील नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्सअ‍ॅप तसेच अन्य माध्यमातून क्युआर कोड पाठवण्यात येत आहे. क्युआर कोड स्कॅन करुनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. 

Advertisement

स्वच्छताविषयक विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जाणार आहे. सेवेसाठी नोंदणी केलेल्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सदर कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृतीही केली जाईल, अशी माहितीही दिघावकर यांनी दिली आहे.