Tips To Prevent Car Brake Fail Major Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. गुरुवारी (ता.13, नोव्हेंबर) नवले पुलावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने ही भयंकर दुर्घटना घडली. या ब्रेकफेल कंटेनरने १०-१२ गाड्यांना धडक दिली ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक जखमी झालेत. याआधीही नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या वाहनांमुळे मोठ्या दुर्घटना घडल्यात. त्यामुळे वाहन चालवताना ब्रेक फेल झाल्यास काय करावे? काय करु नये? याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या याबाबतच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी:
गाडीचा ब्रेक फेल झाल्यास काय करावे? | What to do If Car Break Fail
घाबरुन जाऊ नका: सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरुन न जाता शांतपणे परिस्थिती हाताळा. घाईगडबडीत अनेकदा धोका वाढू शकतो. त्यामुळे शांतपणे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योजना करा.
ब्रेक पेडल दाबत राहा: गाडीचा ब्रेक फेल झाला असला तरी तरी पंपिंग करत (वारंवार दाबणे-सोडणे) ब्रेक प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा पंपिंगमुळे ब्रेक पॅडल जाम होऊन पुन्हा काम करु शकते. त्यामुळे ब्रेक पॅडल दाबत राहा.
गियर डाउनशिफ्ट करा: ब्रेक फेल झाल्यानंतर मॅन्युअल गाडी असल्यास हळूहळू लोअर गियरमध्ये टाका, जेणेकरून इंजिन ब्रेकिंगने गाडीचा वेग कमी होईल. हे करताना गाडी अचानक लो गिअरवर आणू नका, हळूहळू एक एक गियर कमी करा.
हॅंडब्रेक (इमर्जन्सी ब्रेक) वापरा: गाडीचा हँडब्रेक वापरायला सुरुवात करा. मात्र हँडब्रेक खेचताना अचानक खेचू नका. हळूहळू हँडब्रेक खेचा. जेणेकरून गाडी घसरणार नाही किंवा पलट होणार नाही.
हॉर्न वाजवा आणि इंडिकेटर द्या: आपल्या गाडीच्या पुढे मागे असणाऱ्या वाहनांना सावध करा. इतर वाहनांना सतर्क करा, जेणेकरून ते बाजूला होतील. गाडीची पार्किंग लाईट सुरु करा.
रस्त्याच्या बाजूला न्या: शक्य असल्यास गाडी रस्त्याच्या डाव्या किंवा रुंद भागाकडे वळवा. इमर्जन्सी लेन्समध्ये गाडी नेण्याचा प्रयत्न करा. इतर गाड्यांना धडक देण्याऐवजी गाडी शेतात किंवा मोकळ्या जागेत थांबवण्याचा प्रयत्न करा.
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार अपघात का होतात?
ब्रेक फेल झाल्यास काय करु नये?
इंजिन बंद करू नका: गाडीचा ब्रेक फेल झाल्यास इंजिन अजिबात बंद करु नका. इंजिन चालू ठेवा, कारण पॉवर स्टीयरिंग आणि ब्रेक बूस्टर काम करत राहतील. गाडीचा एक्सलेटर किंवा क्लच दाबू नका. गाडी न्युट्रल होऊ देऊ नका.
गर्दीकडे वळू नका: गाडी वेगात असल्यास लोकांकडे, इतर वाहनांकडे वळवू नका किंवा धडक देण्याचा प्रयत्न करु नका. अशावेळी धडक देणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते किंवा गाडी पेटही घेऊ शकते.
हँडब्रेक ओढू नका: गाडीचा ब्रेक फेल झाल्यास हँडब्रेक ओढू नका, अशावेळी गाडी पलटी होण्याची शक्यता असते. तसेच धावत्या गाडीतून उडी मारायचाही प्रयत्न करु नका.