Aayudh Puja 2025| Dussehra Shastra Puja 2025: आश्विन महिन्यातील शुद्ध दशमी तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी एक नव्हे तर कित्येक पूजा आणि उत्सव साजरे केले जातात. मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी श्री राम यांनी रावणाचा वध करुन लंका जिंकली होती. शस्त्रपूजेची परंपरा दुर्गामातेने महिषासुराचा वध केल्याच्या पौराणिक कथेशी आणि महाभारतातील एका कथेशी जोडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर दसऱ्या दिवशी शस्त्रांचीही विशेष स्वरुपात पूजा केली जाते. तसेच नवीन वाहनं, वस्तू खरेदी करण्यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो. कारण हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा सणादिवशी शस्त्रपूजा करण्याचे महत्त्व काय आहे आणि शस्त्रांची पूजा कशी करावी? याबाबत माहिती जाणून घेऊया...
शस्त्रांची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त | Dussehra Shastra Puja 2025 Muhurat
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला शस्त्रांची पूजा करणे शुभ मानले जाते. यंदा ही शुभ तिथी 2 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी सर्वात उत्तम मुहूर्त दुपारी 2.09 वाजेपासून ते दुपारी 02:56 वाजेपर्यंत आहे. याव्यतिरिक्त दुपारी 01:28 वाजेपासून ते दुपारी 02:51 वाजेपर्यंतही पूजा करू शकता.
- अभिजित मुहूर्त : सकाळी 11:46 वाजेपासून ते दुपारी 12:34 वाजेपर्यंत आहे.
- अमृत काळ : 2 ऑक्टोबर रात्री 11:01 वाजेपासून ते उत्तररात्री 12:38 (AM,3 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
- विजय मुहूर्त : दुपारी 2:09 वाजेपासून ते दुपारी 2:56 वाजेपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6:06 वाजेपासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आहे.
- निशिता मुहूर्त : रात्री 11:46 वाजेपासून ते उत्तररात्री 12:35 (AM,3 ऑक्टोबर ) वाजेपर्यंत आहे.
- ब्रह्म मुहूर्त : पहाटे 4:38 वाजेपासून ते पहाटे 5:26 वाजेपर्यंत आहे.
(नक्की वाचा: Happy Dussehra 2025 Wishes: रावण नव्हे रामासारखे वागण्याची प्रतिज्ञा घ्या, दसरा सणाच्या खास शुभेच्छा पाठवा)
विजयादशमी दिवशी शस्त्रांची पूजा कशी करावी? | Dussehra 2025 Shastra Puja Vidhi
- दसऱ्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यासाठी पहाटे उठून स्नान करा.
- सर्वप्रथम दुर्गामातेची विधीवत पूजा करावी.
- यानंतर तुमची शस्त्र काळजीपूर्वक स्वच्छ करा, त्यावर गंगाजल शिंपडावे.
- शस्त्रांवर हळद-कुंकू, चंदन, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.
- दुर्गा देवीकडे शत्रूंवर विजय आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद मागावा.
Photo Credit: Canva
शस्त्रांशी संबंधित पौराणिक कथा
- शस्त्रांशी संबंधित दोन पौराणिक कथांचा उल्लेख आढळतो. यापैकी एक कथा दुर्गा देवीशी संबंधित आहे. मान्यतेनुसार राक्षस महिषासुराचा वध करण्यासाठी देवतांनी दुर्गामातेकडे धावा केला होता, त्यावेळेस त्यांनी मातेला अनेक दैवी शस्त्रंही दिली होती. दुर्गामातेने महिषासुराचा वध केल्यानंतर त्या सर्व दैवी शस्त्रांची विशेष स्वरुपात पूजा करण्यात आली.
- शस्त्रपूजेचा संबंध महाभारताच्या काळाशीही जोडलेला आहे. अज्ञातवास संपताच पांडवांनी शमीच्या वृक्षावरची त्यांची शस्त्रे परत घेतली होती आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरवसेनेवर विजय मिळवला होता, त्या दिवशीही विजयादशमी होती, असे म्हणतात.
- तसेच याच दिवशी श्री रामाने रावणाचा वध करून विजय मिळवला होता, असेही म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)