Dussehra 2025: दसरा सण हा हिंदू धर्मातील महत्त्वांच्या उत्सवांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमीला दसरा सण जल्लोषात साजरा केला जातो. दसरा सणाला विजयादशमी असेही म्हणतात. आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जातो. विजयादशमी दिवशी या सणाची सांगता केली जाते. महिषासूरसह अन्य राक्षसांना मारण्यासाठी दुर्गामातेने चंडीचा अवतार घेऊन नऊ दिवस राक्षसांसोबत युद्ध केले होते. दशमीदिवशी तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला. तेव्हापासून या आश्विन महिन्यातील दशमी तिथीला दसरा सण साजरा करुन आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. यंदा दसरा कधी आहे? शुभ मुहूर्त काय आहे? यासह अन्य महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...
दसरा कधी आहे? | When is Dussehra 2025 Date and Timings
आश्विन महिन्यातील दशमी तिथी 2 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे यंदा 2 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाणार आहे.
दसरा शुभ मुहूर्त | Dussehra 2025 Shubh Muhurat
विजय मुहूर्त दुपारी 2.27 वाजेपासून ते दुपारी 3.14 वाजेपर्यंत असणार आहे.
विजयादशमीच्या दिवशी शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते.
दसरा सणाचे धार्मिक महत्त्व
दसरा सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. विजयादशमी उत्सव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानला जातो. भारतात दसरा सण दुर्गा पूजा आणि दुर्गा विसर्जनाच्या स्वरुपात साजरा केला जातो. महिषासूर राक्षसावर देवी दुर्गेच्या विजयाचे स्मरणही या दिवसांत केले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रुपांची विधीवत पूजा केला जाते. काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
(नक्की वाचा: Navratri 2025 Kanya Pujan: शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन कसे करावे? संपूर्ण विधी आणि महत्त्व वाचा)
उत्तर भारतामध्ये दसऱ्याला प्रामुख्याने रामलीला आणि रावण दहन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी श्री रामाने रावणाचा वध करुन सीतामातेची सुटका केल्याचे म्हटले जाते. विविध शहरांमध्ये रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हा कार्यक्रम केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो, कारण याद्वारे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश दिला जातो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)