E-Commerce Sale Reality : महासेलचा खरा खेळ! खरंच सवलत असते की ग्राहकांना अडकवण्याचा ट्रॅप?

सणासुदीच्या काळात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या भरघोस सवलतींचा खरा खेळ काय असतो? नो-कॉस्ट ईएमआय, फोमो इफेक्ट आणि डार्क पॅटर्न्सच्या माध्यमातून ग्राहकांना कसे जाळ्यात ओढले जाते, याचे सविस्तर विश्लेषण.

जाहिरात
Read Time: 3 mins

सणासुदीचा काळ जवळ आला की ई-कॉमर्स वेबसाईट्सवर 'मॅसिव्ह डिस्काउंट', 'महासेल' आणि 'मेगा ऑफर्स'चा पाऊस पडू लागतो. 50% ते 80% सूट पाहून आपण अनेकदा गरज नसलेल्या वस्तूही खरेदी करून बसतो. पण कधी विचार केलाय का, या सेल्स दरम्यान अशी काय जादू होते की आपण आपोआप तिथे खेचले जातो? ही कोणतीही जादू नसून डिजिटल युगातील एक मानसिक सवय आहे, ज्याला 'कंपल्सिव्ह बाइंग डिसऑर्डर' म्हटले जाते. कंपन्या ग्राहकांच्या मानशास्त्राचा अभ्यास करून त्यांना खरेदी करायला भाग पाडतात. या ई-कॉमर्स सेल्समागचे सगळे गुपिते आणि 'डार्क पॅटर्न्स' समजून घेऊयात.

'FOMO'  चा खेळ

सेलदरम्यान स्क्रीनवर लाल रंगाचा टायमर सतत चमकताना दिसतो. "फक्त २ तास उरलेत!"* किंवा *"स्टॉक संपत आलाय", हे पाहताच मेंदूमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. आपल्याला वाटते की, आताच खरेदी केली नाही तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. याच घाईघाईत आपण कसलाही विचार न करता 'Buy Now' वर क्लिक करतो.

Advertisement

'अँकरिंग इफेक्ट' आणि फुगवलेल्या किमती

एखाद्या घड्याळाची मूळ किंमत 5000 रुपये दाखवून त्यावर 70% सूट देऊन ते 1500 रुपयांना विकले जाते. ग्राहकाला वाटते की त्याने तब्बल 3500 रुपये वाचवले. परंतु वस्तुस्थिती अशी असते की, त्या घड्याळाची बाजारातील खरी किंमतच 1500 रुपयांच्या आसपास असते. आधी किमती फुगवून सांगायच्या आणि नंतर सूट दिल्याचा देखावा करायचा, हा या कंपन्यांचा जुनाच फंडा आहे.

एक्स्पायरी जवळील माल आणि 'No Return' पॉलिसी

अशा महासेलमध्ये अनेकदा गोदामात बऱ्याच दिवसांपासून पडून असलेला माल बाहेर काढला जातो. विशेषतः कॉस्मेटिक्स, सौंदर्यप्रसाधने किंवा खाद्यपदार्थांच्या बाबतीत, ज्यांची एक्स्पायरी डेट अगदी जवळ आली आहे, अशा वस्तू मोठ्या सवलतीत विकल्या जातात. अनेक वस्तूंवर 'No Return / No Exchange' धोरण लागू केले जाते, ज्यामुळे खराब वस्तू आल्यास ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

'नो-कॉस्ट EMI' चे छुपे सत्य
 
एखादी महागडी वस्तू खरेदी करताना पैसे एकदम भरायला लागले तर ग्राहक विचार करतो, पण जर तिथे 'फक्त 499 प्रति महिना' किंवा 'No-Cost EMI' लिहिले असेल, तर ती वस्तू परवडणारी वाटू लागते. लक्षात ठेवा कोणतीही बँक किंवा कंपनी विनाव्याज सेवा देत नाही. रोख पैशांवर मिळणारा डिस्काउंट ईएमआय निवडल्यावर रद्द केला जातो, किंवा प्रोसेसिंग फी आणि जीएसटीच्या माध्यमातून ते पैसे वसूल केले जातात. याशिवाय '10% इन्स्टंट डिस्काउंट'च्या खाली बारीक अक्षरात 'किमान खरेदी 5000 आवश्यक' अशा अटी लपलेल्या असतात.

डार्क पॅटर्न्स

वेबसाईट्स आणि अ‍ॅप्स अशा प्रकारे डिझाइन केले जातात की ग्राहकांचे लक्ष मूळ किमतीऐवजी ऑफरवर जाते. मुख्य किंमत मोठी दाखवणे आणि खाली लपवून डिलिव्हरी चार्ज जोडणे, याला 'Dark Patterns' म्हणतात.

Advertisement

डिजिटल शॉपिंगच्या जाळ्यातून स्वतःला कसे वाचवाल?

  • खरेदी करण्यापूर्वी तीच वस्तू दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कितीला आहे ते तपासा. 
  • ऑनलाईन टूल्स वापरून वस्तूची प्राईज हिस्ट्री तपासा, जेणेकरून सेलपूर्वी किंमत वाढवली होती का ते समजेल.
  • कोणतीही वस्तू कार्टमध्ये टाकल्यानंतर लगेच खरेदी न करता 48 तास वाट पहा. जर तरीही गरज वाटली, तरच खरेदी करा. 
  • जर ही ऑफर किंवा डिस्काउंट नसता, तर मला या वस्तूची खरोखर गरज होती का?"* याचे उत्तर 'नाही' असेल तर खरेदी टाळा.
     

Topics mentioned in this article