Dry Cough Home Remedies: कोरड्या खोकल्यावर 4 घरगुती उपाय, रात्री लागेल शांत झोप

संध्याकाळनंतर खासकरून रात्री झोपताना खोकल्याची उबळ येते आणि खोकून-खोकून जीव जायची वेळ येते. यामुळे धड झोपही लागत नाही

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सध्या वातावरणात बरेच चढ उतार होतायत.  कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन अशी स्थिती मुंबई-पुणे यासह राज्याच्या बहुतांश भागात आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. या काळात सर्दी, घसा खवखवणे आणि विशेषतः कोरडा खोकला यांसारख्या समस्यांनी डोके वर काढले आहे. डॉक्टरांच्या क्लिनीकमध्ये सर्दी, खोकला आणि अंगात कणकण असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढलेली दिसते आहे. यापैकी अनेकांचे म्हणणे आहे की दिवसा खोकल्याचा फार त्रास होत नाही. मात्र संध्याकाळनंतर खासकरून रात्री झोपताना खोकल्याची उबळ येते आणि खोकून-खोकून जीव जायची वेळ येते. यामुळे धड झोपही लागत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.  कोरडा खोकला हा या काळात अनेकांसाठी त्रासदायक ठरतो. 

नक्की वाचा: हिवाळ्यात सांधे जास्त का दुखतात? वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा 8 टिप्स

कोरड्या खोकल्याचा त्रास का होतो ?

सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास कोरडा खोकल्यात कफ सुकतो आणि तो सहजासहजी शरीराबाहेर पडत नाही.  यामुळे घशात सतत कोरडेपणा जाणवतो आणि घशात काहीतरी टोचतंय असं वाटत राहतं. याची अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील बदल, प्रदूषण यामुळे होणारा संसर्ग हे याचे मुख्य कारण मानले जाते. या वातावरणात दमा असलेल्यांनाही बराच त्रास होतो. धुम्रपानाची सवय असलेल्यांना आणि व्हायरल इन्फेक्शन झालेल्यांनाही या काळात बराच त्रास होतो. फुफ्फुसाचे आजार किंवा काही विशिष्ट औषधांच्या सेवनामुळेही कोरडा खोकला उद्भवू शकतो.

नक्की वाचा: त्वचेवर ग्लो येण्यासाठी 7 दिवस प्या 7 ज्युस, चेहऱ्यासाठी सर्वात बेस्ट पेय कोणते? वाचा माहिती

कोरडा खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी उपाय कोणते आहेत ? (Dry Cough Home Remedies)

यावर मात करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय अत्यंत गुणकारी ठरतात. सगळ्यात महत्त्वाची बाब जी गरजेची आहे ती म्हणजे, शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवणे. शरीरातील पाण्याची पातळी योग्य असल्यास  घशाचा कोरडेपणा कमी होतो. यासाठी हर्बल टी, सूप किंवा कोमट पाण्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते. मध आणि लिंबू हे मिश्रण तर कोरडा खोकला दूर करण्यासाठी सगळ्यात प्रभावी मानले जाते.  मधामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे घशाला आराम मिळतो, तर लिंबातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते. एक चमचा मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून घेतल्यास त्वरित आराम मिळतो. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सुमारे 20 ते 30 ग्रॅम किसलेले आले कोमट पाण्यात किंवा मधात मिसळून त्याचे चाटण किंवा चहा करून प्यायल्यास खोकला कमी होतो. डाळिंबाची साल ही देखील कोरड्या खोकल्यावर प्रभावी औषध मानली जाते. डाळिंबाची साल कोमट पाण्यात भिजवून ते कोमट पाणी प्यायल्यास घशाला शेक मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)