Ekadashi 2026: मार्चमध्ये 2 एकादशी, पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशीची योग्य तारीख, पूजा विधी वाचा सविस्तर

Ekadashi 2026 March: मार्च 2026 मध्येही दोन महत्त्वपूर्ण एकादशी आहेत. यापैकी पहिली पापमोचनी एकादशी आणि दुसरी कामदा एकादशी, जाणून घेऊया योग्य तारीख, पूजा विधीची सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
Ekadashi March 2026: मार्च महिन्यातील एकादशी कधी आहे?
Canva

Ekadashi March 2026: हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी व्रत - पूजा केल्यास भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनातील संकटं दूर होतात. हिंदू पंचांगानुसार, वर्षात एकूण 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे असते. मार्च 2026 मध्ये देखील दोन महत्त्वाच्या एकादशी येत आहेत. त्यापैकी पहिली पापमोचनी एकादशी आणि दुसरी कामदा एकादशी आहे. जाणून घेऊया या दोन्ही एकादशींच्या तारखा आणि पूजेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.

पापमोचनी एकादशी कधी आहे?

धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला 'पापमोचनी एकादशी' म्हटले जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीच्या हातून कळत-नकळत झालेल्या पापांचा नाश होतो तसेच जीवनात सुख-शांती येते. पंचांगानुसार यावेळी पापमोचनी एकादशीची तिथी 14 मार्च रोजी सकाळी 8.10 वाजता सुरू होऊन 15 मार्च रोजी सकाळी 9. 16 वाजता समाप्त होणार आहे. उदया तिथीच्या नियमानुसार 15 मार्च 2026 रोजी पापमोचनी एकादशीच्या व्रताचे पालन केले जाईल.

Advertisement

कामदा एकादशीची अचूक तारीख

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'कामदा एकादशी' म्हटले जाते. ही हिंदू नववर्षातील पहिली एकादशी मानली जाते. या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, अशी मान्यता आहे.

यंदा कामदा एकादशी 29 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काही शुभ योग देखील तयार होत आहेत, त्यामुळे या पूजेचे आणि व्रताचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

एकादशी व्रताची पूजा विधी
  • एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • त्यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडावा.
  • पूजेच्या वेळी देवाला धूप, दीप, फुले आणि फळे अर्पण करावी.
  • नैवेद्यात मिठाई आणि तुळशीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
  • या दिवशी विष्णू मंत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करणे लाभदायक ठरते.
  • दिवसभर व्रत करून संध्याकाळी भगवंताची आरती करावी.
  • दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला पूजा केल्यानंतर व्रताचे पारण (व्रत सोडणे) केले जाते. 

मनोभावे एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात; अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)