Frequent Headache Causes: डोकेदुखी ही एक सामान्य समस्या समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. थकवा, पुरेशी झोप न मिळणे, कामाचा ताण, शरीरातील पाणी कमी होणे किंवा जास्त वेळ मोबाइल आणि कम्प्युटर स्क्रीन पाहिल्यामुळे डोके दुखणे ही सामान्य गोष्ट आहे आणि विश्रांती घेतल्याने डोकेदुखी थांबतेही. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक डोकेदुखी सामान्य नसते. जेव्हा हा त्रास वारंवार होऊ लागतो किंवा यासोबत शरीरात काही असामान्य बदल दिसू लागतात, तेव्हा याकडे हलकेपणाने पाहणे योग्य नाही. अनेकदा हेच बदल एखाद्या गंभीर न्युरोलॉजिकल समस्येचे जसे की ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
वारंवार होणारी डोकेदुखी या आजाराचे कारण ठरू शकते
ब्रेन ट्युमरबाबत सर्वात मोठा गैरसमज हा आहे की, त्याचे पहिले आणि सर्वात मोठे लक्षण म्हणजे तीव्र आणि असह्य डोकेदुखी असते. पण वैद्यकीय संशोधन असे सांगते की, सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार अनेकदा अतिशय साध्या लक्षणांसह सुरू होतो, ज्याला लोक सामान्य थकवा किंवा ताणतणाव समजतात. याच कारणामुळे अनेक प्रकरणांमध्ये योग्य वेळी या आजाराचे निदान होऊ शकत नाही. ब्रेन ट्युमरची लक्षणे या गोष्टीवर अवलंबून असतात की ट्युमर मेंदूच्या कोणत्या भागात आहे? त्याचा आकार केवढा आहे? तो किती वेगाने वाढत आहे?
ब्रेन ट्युमरची लक्षणे
जेव्हा मेंदूमध्ये एखाद्या ठिकाणी असामान्य पेशींची वाढ सुरू होते, तेव्हा त्या आसपासच्या ऊतींवर (Tissues) दाब निर्माण करू लागतात. याच दाबामुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू शकतात. जर ट्युमर विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या किंवा स्मरणशक्तीशी संबंधित भागात असेल तर व्यक्तीला गोष्टी विसरणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे किंवा निर्णय घेताना त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अनेक लोक याला वाढते वय किंवा मानसिक ताण समजतात तर प्रत्यक्षात हे एक सुरुवातीचे संकेत असू शकते.
तसेच ट्युमर पाहण्याच्या क्षमतेला नियंत्रित करतो, व्यक्तीला अंधुक दिसणे, एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे (Double Vision) किंवा दृष्टी कमकुवत होणे यासारख्या समस्या होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये रुग्णाला बोलताना अडचण येऊ लागते किंवा योग्य शब्द निवडण्यात त्रास जाणवतो. हे बदल हळूहळू होत असल्यामुळे लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
(नक्की वाचा: How To Quit Smoking: वीकेंडला दारू अन् रोज 2 सिगारेट पिता? आधी कोणती सवय सोडावी? एम्सच्या डॉक्टरांनी दिला सल्ला)
ब्रेन ट्युमरमुळे होणारा त्रास
ब्रेन ट्युमरचा परिणाम शरीराच्या संतुलनावर आणि स्नायूंवरही होऊ शकतो. अशा परिस्थितीत व्यक्तीला चालताना तोल जाणे किंवा लटपटणे, हात-पायांमध्ये कमकुवतपणा येऊ शकतो किंवा दैनंदिन कामे करताना अडचणी येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये अचानक चिडचिड होणे, वागण्यात बदल होणे किंवा लोकांमध्ये जाणे टाळणे असे बदलही पाहायला मिळतात, जे सहसा मानसिक ताण असल्याचे लक्षण समजले जाते.
(नक्की वाचा: पावसाळ्यात सांधेदुखी,अंग आखडण्याच्या समस्येने हैराण आहात? निरोगी आरोग्यासाठी डॉ धामणकरांनी सांगितल्या 8 टिप्स)
डॉक्टरांकडे कधी जावे?
प्रत्येकवेळेस होणारी डोकेदुखी धोकादायक नसते, पण काही संकेत असे असतात ज्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर डोकेदुखी सतत वाढत असेल, वारंवार उद्भवत असेल, डोकेदुखीमुळे रात्री झोपेतून जाग येत असेल किंवा ती पूर्वीपेक्षा वेगळी आणि तीव्र जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर यासोबतच उलट्या होणे, शरीराचा तोल सांभाळणे कठीण होत असेल, दृष्टीमध्ये बदल होणे, अशक्तपणा किंवा मानसिक गोंधळ (Confusion) यासारखी लक्षणे दिसत असतील तर ही स्थिती अधिक गंभीर असू शकते.
(Content Source IANS)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)