Google Gemini Trend: गुगलच्या ‘जेमिनी नॅनो बनाना'ने (Gemini Nano Banana) इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. जेमिनी नॅनो बनाना 2025 मधील सर्वाधिक लोकप्रिय AI ट्रेंडपैकी एक बनले आहे. यात सामान्य फोटोंना नव्या रुपात रूपांतरित करते. मात्र, या प्रचंड मागणीमुळे गुगलने आपल्या इमेज जनरेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. पूर्वी जेमिनीच्या फ्री युजर्सना दररोज 100 इमेज जनरेशनची मर्यादा होती. तर प्रो आणि अल्ट्रा युजर्ससाठी 1,000 पर्यंतची मर्यादा होती. आता या निश्चित मर्यादा काढून टाकण्यात आल्या आहेत.
या धोरणातील बदलामुळे, आता फ्री यूजर्सना ‘बेसिक ॲक्सेस' आणि सशुल्क युजर्ससाठी ‘हायएस्ट ॲक्सेस' असे दोन टप्पे तयार करण्यात आले आहेत. या बदलामुळे गुगलला सर्व्हरची क्षमता आणि मागणीनुसार मर्यादांमध्ये बदल करता येणार आहे. याचा अर्थ असा की, जास्त वापर असलेल्या फ्री यूजर्सना निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. तर पैसे भरणार्या ग्राहकांना नेहमीच प्राधान्य आणि जलद ॲक्सेस मिळत राहणार आहे.
(नक्की वाचा- Google Gemini Trend : गुगल जेमिनीतून बनवा आतापर्यंतचे सर्वात सुंदर फोटो; हे 10 Prompt नक्की ट्राय करा)
फ्री युजर्ससाठी नियम
पूर्वी दररोज 100 इमेज जनरेशनची मर्यादा असल्यामुळे ‘जेमिनी नॅनो बनाना' हे सर्वात जास्त इमेज जनरेशन देणाऱ्या मोफत AI प्लॅटफॉर्मपैकी एक होते. आता नवीन धोरणानुसार ही संख्या काढून ‘बेसिक ॲक्सेस' असे नमूद करण्यात आले आहे. जरी गुगलने आता निश्चित संख्या दिली नसली तरी, ‘नॅनो बनाना' आजही इतर प्रतिस्पर्धकांपेक्षा जास्त इमेज जनरेशनची संधी देत आहे. मात्र High Traffic असलेल्या वेळी वापर कमी केला जाऊ शकतो.
प्रो आणि अल्ट्रा युजर्ससाठी
सशुल्क युजर्ससाठी आता ‘हायएस्ट ॲक्सेस' हे नवीन धोरण आहे. पूर्वी 1,000 इमेज जनरेशनची मर्यादा होती, पण आता ती संख्या सार्वजनिकपणे दिसत नाही. यामुळे गुगलला आपल्या सर्व्हर क्षमतेनुसार मर्यादा बदलता येतात. त्यामुळे व्यावसायिकांना, डिझाइनर्सना आणि कलाकारांना नियमित आणि जलद सेवा मिळण्याची खात्री मिळते, ज्यामुळे त्यांच्या कामात कोणतीही अडचण येत नाही.
(नक्की वाचा- Gemini AI Saree Photos Trend: मराठमोळ्या अभिनेत्रींचे रेट्रो साडी लुकमधील 12 फोटो पाहून म्हणाल: चांद तू नभातला)
या नवीन धोरणानंतरही, ‘जेमिनी नॅनो बनाना' अजूनही त्याच्या प्रतिस्पर्धकांपेक्षा पुढे आहे. याची 3D मॉडेल्स तयार करण्याची क्षमता, वेग आणि वापरण्यास सोपा इंटरफेस यामुळे ते क्रिएटीव्ह लोकांसाठी एक उत्कृष्ट साधन बनले आहे. या बदलत्या धोरणांमुळे, गुगल भविष्यात अधिक कार्यक्षम आणि मागणीनुसार AI सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.