Guru Purnima: गुरुकृपा म्हणजे काय? गुरुमंत्र घेतल्यानंतर जीवनात काय बदल होतो? वाचा ज्योतिषींनी दिलेली माहिती

Guru Purnima 2026: पत्रिकेत साडेसाती, मंगळदोष किंवा आर्थिक संकटे असल्यास घाबरू नका. श्री गुरुचरित्रातील विचार आणि गुरुमंत्राच्या जपाने जीवनात कसे सकारात्मक परिवर्तन घडवता येते, हे जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Guru Purnima 2026: गुरूकृपा म्हणजे नेमके काय?"
Canva

- श्रीकेतन कुलकर्णी गुरुजी

Guru Purnima 2026:  "जिथे ग्रहांची मर्यादा संपते, तिथे सद्गुरूंच्या कृपेची सुरुवात होते." आज अनेकजण जन्मपत्रिका घेऊन येतात आणि म्हणतात, "गुरुजी, माझ्या पत्रिकेत साडेसाती आहे, मंगळदोष आहे, चांडाळ योग आहे, राहू-केतूचा त्रास आहे, विवाहात अडथळे आहेत, दोन-दोन लग्नाचे योग आहेत, घटस्फोटाचे योग आहेत, आर्थिक संकटे आहेत, अपघाताची भीती आहे. माझे भाग्यच खराब आहे."

सज्जनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा... ग्रहांचे स्थान महत्त्वाचे असले तरी गुरुकृपेचे स्थान त्याहून श्रेष्ठ मानले गेले आहे.

श्री गुरुचरित्राच्या 53व्या अध्यायातील भावार्थ असा सांगतो की, जरी ब्रह्मदेवाने प्रारब्धानुसार कपाळावर कठीण लेख लिहिला असला तरी तोच माथा सद्गुरूंच्या चरणी नम्रतेने टेकला, गुरुभक्ती, सेवा आणि साधना केली तर सद्गुरूंच्या कृपेने जीवनात शुभ परिवर्तन घडू शकते. म्हणूनच आपल्या सनातन परंपरेत देहधारी सद्गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण मानले गेले आहे.

Advertisement

गुरुमंत्राचे महत्त्व आणि आध्यात्मिक पुनर्जन्म (Significance of Gurumantra & Spiritual Rebirth)

जेव्हा सद्गुरू आपल्या शिष्याच्या कानामध्ये गुरुमंत्र देतात आणि प्रेमाने मस्तकावर कृपाहस्त ठेवतात, तेव्हा तो केवळ मंत्र देण्याचा विधी नसतो; तो शिष्याच्या आध्यात्मिक जीवनाचा नवीन जन्म असतो. अनेक भक्तांचा दृढ विश्वास आहे की गुरुमंत्राचा नित्य जप, गुरूंचे आशीर्वाद आणि साधना यामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू लागते. अनेक साधकांना ग्रहदोषांची तीव्रता कमी झाल्यासारखे वाटते, मनाला धैर्य मिळते आणि योग्य मार्ग सापडतो.

(नक्की वाचा: Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा कधी आहे? 28 जुलै की 29 जुलै? जाणून घ्या योग्य तिथी आणि तारीख)

गुरुपौर्णिमा, पाद्यपूजन आणि भाग्योदय (Guru Purnima, Padapuja, and the Transformation of Destiny)

गुरुपौर्णिमा हा गुरुमंत्र ग्रहण करण्यासाठी पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने सद्गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा, कारण गुरुमंत्र हा फक्त कानात सांगितलेला शब्द नसतो; तो गुरूंची कृपा, आशीर्वाद आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा दिव्य मार्ग असतो. गुरुपौर्णिमेला जेव्हा आपण श्रद्धेने सद्गुरूंचे पाद्यपूजन करतो, दूध, पाणी आणि पूजासाहित्याने गुरूंचे चरण धुतो, चरणी मस्तक ठेवतो, तेव्हा अनेक भक्तांचा असा अनुभव आणि विश्वास असतो की गुरुकृपेने जीवनातील दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होऊ लागते. काही साधकांना असे वाटते की जणू त्यांच्या भाग्यरेषा, आयुष्याची दिशा आणि जीवनाचा प्रवासच बदलू लागला आहे.

हा बदल केवळ हातावरील रेषांचा नसतो; तो मनाचा, विचारांचा, कर्माचा आणि जीवन जगण्याच्या दृष्टिकोनाचाही असतो. गुरुकृपेने श्रद्धा दृढ होते, आत्मविश्वास वाढतो, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो.

म्हणूनच 

  • सद्गुरूंच्या चरणी अहंकार विसरून शरण जा.
  • गुरुपौर्णिमेला श्रद्धेने पाद्यपूजन करा.
  • विधीपूर्वक सद्गुरूकडून गुरुमंत्र ग्रहण करा.
  • गुरूंच्या आज्ञेप्रमाणे नित्य गुरुमंत्राचा जप करा.
  • श्री गुरुचरित्र वाचन, नामस्मरण आणि सेवा कधीही सोडू नका.

हे देखील लक्षात ठेवा

ग्रह आपल्या कर्मांचे फळ दाखवतात, पण सद्गुरू त्या कर्मांना योग्य प्रकारे स्वीकारण्याची शक्ती, योग्य दिशा आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग देतात. ज्याच्या डोक्यावर सद्गुरूंचा कृपाहस्त असतो, ज्याच्या कानात गुरुमंत्राचा दिव्य नाद घुमत असतो आणि ज्याच्या हृदयात गुरूंविषयी अखंड श्रद्धा असते, त्याचे जीवन हळूहळू बदलत जाते. गुरू भेटणे हे नशिबाने मिळते, पण गुरूंची सेवा करणे, त्यांची आज्ञा पाळणे आणि गुरुमंत्राचा जप करणे हे आपल्या हातात आहे. हाच खरा गुरुकृपेचा मार्ग आहे.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)