Hanuman Jayanti 2024: वसईतील न्यू इंग्लिश शाळेतील कला शिक्षक कौशिक जाधव यांनी हनुमान जयंतीनिमित्ताने (Hanuman Jayanti) तुळशीच्या पानावर हनुमानाचे चित्र रेखाटले आहे. वॉटर कलर्सचा वापर करून त्यांनी जाधव यांनी केवळ 30 मिनिटांमध्ये हनुमानाचे सुंदर चित्र साकारले. रामनवमीनिमित्त त्यांनी राम फळावर भगवान श्रीरामाचेही चित्र रेखाटले होते. वेगवेगळ्या सण-समारंभांनिमित्त जाधव नेहमीच आकर्षक व अद्वितीय कलाकृती साकारत असतात. त्यांच्या या अनोख्या कलाकौशल्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असतो.
चित्रकलेची अनोखी शैली
वसई पूर्वेकडील भाताणे गावचे रहिवासी आणि वसईतील बर्वे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश शाळेचे कलाशिक्षक व चित्रकार कौशिक दिलीप जाधव हे आकर्षक पद्धतीने कलाकृती साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
आजवर त्यांनी कित्येक देवीदेवतांचे चित्र रेखाटले आहेत. जाधव यांची चित्र काढण्याची शैली खूपच निराळी आहे, यामुळेच ते कायम चर्चेत असतात.
एक रुपयाच्या नाण्यावर साकारले क्रांतिकारकांचे चित्र
कौशिक यांनी यापूर्वी मोरपंखावर श्री कृष्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांचे चित्र रेखाटले.
तर सुपारीवर अष्टविनायक गणपती व महात्मा गांधी तर एक रूपयाच्या नाण्यावर वीर क्रांतिकारकांचे चित्र रेखाटली आहेत.
हनुमान जयंतीनिमित्ताने कौशिक जाधव यांनी रामभक्त हनुमानाचे तुळशीच्या पानावर सुंदर चित्र रेखाटून नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हनुमानजींसंदर्भातील प्रसिद्ध आख्यायिका
प्रचलित आख्यायिकेनुसार एकदा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये माता सीता जेवण तयार करत होत्या, त्यावेळेस हनुमानजी येऊन म्हणाले की, "आई मला खूप भूक लागली आहे. मला खायला द्या. माता सीतेने तयार केलेले गरमागरम जेवण हनुमानजींना वाढले. त्यांनी हे सर्व जेवण आवडीने खाल्ले पण त्यांची भूक शमली नाही. त्यावेळेस सीतामाईंनी आश्रमातील सर्व पदार्थ त्यांना खाण्यासाठी दिले.
पण हनुमानजींची भूक काही केल्या पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस भगवान श्रीराम यांच्या सांगण्यावरून सीतामाईंनी थोडे जेवण आणि त्यामध्ये तुळशीचे पान दिले. तुळशीपत्र खाल्ल्यानंतर हनुमानजींचे पोट भरले आणि त्यांची भूक शमली. तेव्हापासून हनुमानास तुळशीपत्र किंवा तुळशीची माळ अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली" या आख्यायिकेचा संदर्भ लक्षात घेऊनच तुळशीच्या पानावर हनुमानजींची कलाकृती साकारली, असे कौशिक जाधव यांनी सांगितले.
VIDEO : श्रीखंड पुरीचा बेत करताय? मग पुण्यातल्या या ठिकाणी भेट द्याच !