Hanuman Jayanti 2026: हिंदू धर्मात शक्तीचे स्रोत मानले जाणारे श्री हनुमान हे श्रीरामांचे अनन्य भक्त आणि भगवान शिव यांचे रुद्रावतार मानले जातात. मारुती नंदन हनुमान हे त्या अष्टचिरंजीवींपैकी एक आहेत, ज्यांना अमरत्वाचे वरदान मिळाले आहे आणि ते प्रत्येक युगात पृथ्वीवर उपस्थित असतात.
कलियुगात तर महावीर बजरंगीची साधना त्वरित फलदायी मानली जाते. अशी मान्यता आहे की, खऱ्या मनाने स्मरण करणाऱ्या भक्ताच्या मदतीसाठी हनुमानजी धावून येतात. सर्व संकटांचे निवारण करणारे हनुमानजी पृथ्वीवर नेमके कुठे राहतात आणि त्यांच्या या पवित्र धामाचे रहस्य काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.
गंधमादन पर्वतावर आहे हनुमानजींचे निवासस्थान
भागवत पुराणानुसार, कलियुगात सर्व संकटांचे हरण करणारे हनुमानजी गंधमादन पर्वतावर निवास करतात. श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे प्राध्यापक रामराज उपाध्याय यांच्या मते, विष्णू पुराण आणि वायू पुराणात या हनुमत धामाचा उल्लेख कैलास पर्वताच्या उत्तर दिशेला सुमेरू पर्वताजवळ असल्याचे सांगितले आहे.
धर्म अभ्यासकांच्या मते, हा दिव्य पर्वत सिद्ध ऋषी-मुनींची तपश्चर्या करण्याची जागा आहे, जिथे सामान्य माणसाचे पोहोचणे कठीण आहे. गंधमादन पर्वताचा उल्लेख पाली, त्रिपिटक आणि इतर बौद्ध साहित्यातही आढळतो.
( नक्की वाचा : Honest Woman: प्रामाणिकपणाचा आदर्श! खात्यात आले 10 कोटी रुपये, तरीही डगमगलं नाही मन; महिलेची सर्वत्र चर्चा )
कुबेर, यक्ष आणि अप्सरांचा येथे आहे वास
गंधमादन पर्वताला धार्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत पवित्र आणि दिव्य स्थान मानले गेले आहे. येथे यक्ष, यक्षिणी, किन्नर आणि अप्सरा निवास करतात. तैत्तिरीय आरण्यकानुसार, कुबेर देव उत्तर दिशेचे अधिपती असून त्यांचे निवासस्थान गंधमादन पर्वतावर असल्याचे सांगितले आहे. महाभारताच्या शल्य पर्वातही कुबेरांचा यक्षांशी असलेला संबंध स्पष्ट होतो.
पवनपुत्र हनुमान आजही ज्या गंधमादन पर्वतावर प्रभू श्रीरामांच्या भक्तीत लीन आहेत, ते स्थान कैलास मानसरोवर आणि बद्रीनाथ धाम यांच्या दरम्यान असल्याचे मानले जाते. जेव्हा प्रभू श्रीराम पृथ्वीवरून वैकुंठलोकात जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी हनुमानजींना पृथ्वीवरच राहण्यास सांगितले. त्यानंतर हनुमानजींनी राहण्यासाठी या दिव्य गंधमादन पर्वताची निवड केली.
( नक्की वाचा : Job Exit Rules: नोकरी सोडताय? मग ही बातमी वाचाच! 1 एप्रिलपासून बदललेत नियम, तुमचा होणार मोठा फायदा! )
हनुमानजींनी याच पर्वतावर मोडला होता भीमचा गर्व
महाभारताच्या वनपर्वात गंधमादन पर्वताचा उल्लेख येतो. हे तेच स्थान आहे जिथे भीम आणि हनुमानजींची भेट झाली होती. कथेनुसार, पांडव अज्ञातवासादरम्यान उत्तराखंडमध्ये पोहोचले असताना द्रौपदीला एक कमळाचे पुष्प मिळाले. त्या फुलाचा सुगंध आवडल्याने तिने भीमाला तशी फुले आणायला सांगितली.
भीम जेव्हा गंधमादन पर्वतावर पोहोचला, तेव्हा वाटेत एका वृद्ध वानराने आपली शेपटी पसरवून रस्ता अडवला होता. भीमाने त्याला रस्ता सोडण्यास सांगितले, तेव्हा वानराने सांगितले की तूच ही शेपटी बाजूला करून निघून जा. महाबली भीमाने खूप प्रयत्न केले पण त्याला ती शेपटी हलवता आली नाही. शेवटी भीमाला आपली चूक उमजली आणि ते वृद्ध वानर दुसरे कोणी नसून हनुमानजी आहेत हे त्याने ओळखले. अशा प्रकारे हनुमानजींनी भीमाचा अहंकार दूर केला होता.
परशुरामही पोहोचले होते गंधमादन पर्वतावर
त्रिपुरारहस्य ग्रंथानुसार, भगवान परशुराम आधी महेंद्र पर्वतावर राहत होते. मात्र, जेव्हा त्यांनी सर्व काही भगवान श्रीरामांना समर्पित केले, तेव्हा आध्यात्मिक शांततेसाठी ते भगवान दत्तात्रेयांकडून दीक्षा घेऊन गंधमादन पर्वतावर राहण्यासाठी गेले होते. हनुमानजी केवळ पर्वतावरच नाही, तर जिथे जिथे प्रभू श्रीरामांचे नामस्मरण, भजन किंवा कीर्तन होते, तिथे मारुतीराया डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन हात जोडून उभे असतात, अशी श्रद्धा आहे.
( स्पष्टीकरण : वरील बातमी ही धार्मिक श्रद्धा आणि समजुतीवर आधारित आहे. NDTV नेटवर्क याबाबत कोणतीही पृष्टी करत नाही.)