Momos health hazard news : चवीने खाल्लेले मोमोज एका 10 वर्षांच्या चिमुरडीसाठी चक्क मृत्यूचा सापळा ठरले आहेत. दिल्लीतील बुरारी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबावर असा प्रसंग ओढवला की, ज्यामुळे सर्वांचेच डोळे पांढरे झाले. बाहेरील मोमोज आणि फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे या मुलीचे लिव्हर निकामी झाले आणि तिच्या मेंदूवरही याचा गंभीर परिणाम झाला. साध्या साध्या गोष्टी विसरण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभं राहणंही तिच्यासाठी अशक्य झालं होतं. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ती मृत्यूच्या दारातून परतली आहे.
स्मरणशक्ती गेली आणि पायही लटपटू लागले
दिल्लीतल्या बुरारी भागात राहणाऱ्या सावित्री माथूर आणि किशोर माथूर यांची 10 वर्षांची मुलगी तान्या हिची प्रकृती अचानक खालावली. सुरुवातीला ती लहानसहान गोष्टी विसरू लागली. तिला प्रचंड थकवा जाणवू लागला आणि काही दिवसातच तिला साधं उभं राहणं किंवा चालणंही कठीण झालं.
तान्याला तिच्या पालकांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. शरीरातील विषारी घटकांचा संसर्ग वाढल्यामुळे तिच्या मेंदूला सूज आली होती आणि लिव्हरने काम करणं बंद केलं होतं.
(नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )
पालक कामावर आणि लेक बाहेरच्या खाण्यावर
तान्याचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. घरी आईने बनवलेलं जेवण असतानाही, शाळा सुटल्यानंतर तान्या आपल्या आजोबांकडून पैसे घेऊन बाहेरून मोमोज आणि चिप्स आणून खायची. तिची ही सवय इतकी जीवघेणी ठरेल याची कल्पना कोणालाच नव्हती. सततच्या बाहेरच्या खाण्यामुळे तिला कावीळ झाली आणि तिची अवस्था इतकी गंभीर झाली की तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं.
लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ....
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुरुवातीला तान्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट (प्रत्यारोपण) करावं लागेल, असा सल्ला दिला होता. मात्र, प्लाज्माफेरेसिस या विशेष उपचार पद्धतीमुळे तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. आता पूर्णपणे बरी झाल्यानंतर तान्याने मोमोजला कायमचा रामराम ठोकला आहे. बाहेरील उघड्यावरचे पदार्थ मुलांच्या जीवावर कसे बेतू शकतात, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं आहे.
35 टक्के मुलांमध्ये फॅटी लिव्हरची लक्षणं
या प्रकरणावर बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश शर्मा यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील सुमारे 35 टक्के मुलांमध्ये सध्या फॅटी लिव्हरची लक्षणं दिसून येत आहेत. फास्ट फूडचा अतिवापर, वाढता स्क्रीन टाईम आणि व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयात मुलांचे लिव्हर फेल होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तान्याच्या निमित्ताने समोर आलेली ही घटना प्रत्येक पालकांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.