Pomegranate Benefits: डाळिंबामध्ये पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नियमित एक डाळिंब खाल्ल्यास कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होईल. डाळिंबामध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सी शरीराच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसही कमी करतात. डाळिंबातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासही मदत करतात. डाळिंब खाण्याव्यतिरिक्त या फळाच्या ज्युसमुळेही शरीराचे मेटाबॉलिज्म सुधारण्यास आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होण्यास मदत मिळेल. कित्येक संशोधनातील माहितीनुसार या फळातील पोषणतत्त्व ऑक्सिडेटिव्ह ताण आणि शरीरावरील सूज कमी करते तसेच कोलेस्टेरॉलची पातळीही सुधारण्याचे काम करते. रोज एक डाळिंब खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील तसेच कोणी डाळिंब खाऊ नये, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
आतड्यांसाठी फायदेशीर
डाळिंब खाल्ल्यास शरीराला फायबरचा पुरवठा होतो. यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. रोज डाळिंब खाल्ल्यास शरीरावरील सूज, सांधेदुखी आणि जडपणा कमी होण्यास मदत मिळते. तसेच डाळिंबातील अँटी-ऑक्सिडंट्स मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
डाळिंबमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. यातील अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक संसर्गाविरोधात लढण्यासाठी शरीराला ताकद देतात. काही संशोधनांनुसार डाळिंबामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत, जे प्रोस्टेट आणि स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
(नक्की वाचा: Sleep Mistakes: डोक्याजवळ मोबाइल ठेवून झोपल्यास काय होतं? झोपताना 5 चुका करू नका, तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)
रक्ताच्या गाठी होण्यापासून संरक्षणडाळिंबातील पोषणतत्त्व शरीरामध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून रोखण्याचे कार्य करतात. यामुळे शरीरातील ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा सुधारतो. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. तसेच अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी डाळिंब खाणे फायदेशीर ठरू शकते, कारण यातील लोहाचे प्रमाण शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते.
(नक्की वाचा: Benefits Of Eating Almonds: बदाम किती तास पाण्यात भिजत ठेवावे, बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?)
डाळिंब कोणी खाऊ नये?- डाळिंबामुळे रक्तदाबाची पातळी कमी होण्यास मदत मिळते, त्यामुळे कमी रक्तबादाची समस्या असणाऱ्यांनी डाळिंबाचे सेवन करू नये.
- डाळिंबातील घटक काही औषधांच्या परिणामावर प्रभाव टाकू शकते, त्यामुळे नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाळिंब खाल्ल्यानंतर खाज सुटणे, उलटी होणे किंवा तोंडाला सूज येणे अशी अॅलर्जीची लक्षणे काही लोकांमध्ये दिसू शकतात.
- पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांनी डाळिंब खाणे टाळावे.
- मधुमेहग्रस्तांनी जास्त प्रमाणात डाळिंबाचे सेवन करू नये.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )