Chandra Grahan 2026: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आलीय. 2 मार्च रोजी होलिका दहन असून 3 मार्चला पौर्णिमेसोबतच ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, दाते पंचांगानुसार या दिवशी वेधकाळ असूनही धूलिवंदन आणि होळीचा उत्साह साजरा करता येणार आहे. पण ग्रहणाचे शास्त्र पाळताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती, वृद्ध आणि मुलांसाठी वेधकाळाचे नियम वेगळे आहेत. या लेखाद्वारे आपण होळीच्या पूजेची वेळ, चंद्रग्रहणाचा काळ, वेधकाळात काय करावे आणि काय टाळावे, तसेच अन्नाच्या शुद्धतेसाठी तुळशीपत्राचा वापर कसा करावा? याबाबतची माहिती जाणून घेऊया...
- श्रीकेतन कुलकर्णी, ज्योतिषाचार्य
2 मार्च होलिका दहन | 3 मार्च चंद्रग्रहण आणि धूलिवंदन
(दाते पंचांगानुसार माहिती)
यावर्षी 2026 मध्ये होळी आणि चंद्रग्रहण एकत्र येत असल्याने अनेकांना शंका आहेत. खाली संपूर्ण आणि सोप्या शब्दांत माहिती दिली आहे
2 मार्च 2026 – होलिका दहन
वार: सोमवार
भद्रा असली तरी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करावे.
होलिका पूजन करून कुटुंबासह प्रदक्षिणा करावी.
नकारात्मकता, रोग, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.
3 मार्च 2026 – पौर्णिमा आणि ग्रस्तोदित चंद्रग्रहण
ग्रहण सुरू: दुपारी 3:20 वाजता
भारतामध्ये ग्रहणाचा आरंभ आणि मध्य दिसणार नाही.
चंद्र उदयाला येताना ग्रहण लागलेलेच दिसेल (ग्रस्तोदित).
ग्रहण मोक्ष (समाप्ती): संध्याकाळी 6:48 वाजता
वेधकाळ कधी?
मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू.
आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी सकाळी 11 वाजेपासून वेध पाळावे.
(नक्की वाचा: Holi 2026 Date: होळीची योग्य तारीख, शुभ मुहूर्त, तिथी काळ, होलिका दहनाची पूजा, पौराणिक कथा वाचा सविस्तर माहिती)
वेधकाळात काय करता येईल?- पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल.
- देवाला नैवेद्य दाखवू शकता (अतिशय थोडा).
- अभिषेकाचे तीर्थ प्रसाद म्हणून घेऊ शकता.
- एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता.
- गुरुजी / सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल.
- श्राद्ध (सपिंडक) करता येईल – स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर गाईला द्यावा.
- वेधामध्ये पूजन निषिद्ध नाही, पण भोजन निषिद्ध आहे.
धूलिवंदन (धुळवड) खेळता येईल का?
- होय, वेधकाळात धूलिवंदन आणि रंग खेळणे करता येईल.
- आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून 6:48 वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे.
- काही ठिकाणी पर्वकाल कमी असेल तर 6:48 वाजेनंतर मोक्षस्नान करावे.
- 15–20 मिनिटांपेक्षा जास्त पर्वकाल असल्यास सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा जप करावा आणि 6:48 वाजेनंतर मोक्षस्नान करावे.
- त्यानंतर भोजन करावे.
विशेष सूचना
- ग्रहणकाळात प्रसन्न चित्ताने जप-ध्यान करावे.
- मोक्षस्नानानंतर घर शुद्ध करूनच अन्न ग्रहण करावे.
- या पवित्र काळात सर्वांनी आनंदाने, श्रद्धेने आणि शांतीने उत्सव साजरा करावा.
तुळशीपत्र कुठे ठेवावे? (ग्रहण / पूजनावेळी योग्य पद्धत)
चंद्रग्रहण / सूर्यग्रहणावेळी
- शिजवलेल्या अन्नावर (भात, आमटी, भाजी, दूध, दही) एक तुळशीपत्र ठेवावे.
- पाण्याच्या भांड्यात (पिण्याचे पाणी, तांब्या, माठ) एक पान टाकावे.
- देवमूर्तीसमोर ठेवलेल्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे.
- यामुळे अन्न शुद्ध राहते असे शास्त्रमान्य मानले जाते.
पूजनावेळी (उदा. सत्यनारायण पूजन)
श्री सत्यनारायण भगवानांच्या चरणी एक किंवा पाच तुळशीपत्र अर्पण करावी.
प्रसाद (शिरा/पंचामृत) मध्ये एक तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवावा.
काय करू नये?
- तुळशीपत्र तुटलेले, सुकलेले वापरू नये.
- नखे लावून तोडू नये; सकाळी स्नानानंतरच तोडावे.
- रविवार, एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळस तोडणे टाळावे (परंपरेनुसार).
भावना आणि श्रद्धा महत्त्वाची
योग्य पद्धतीने ठेवलेले तुळशीपत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते असे मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)