Urine Problem: पाणी पिताच जोराची लघवी लागते? अशी करा समस्या दूर

Urine Problem: रोजच्या सवयींमध्ये थोडा बदल केला तर ही समस्या दूर करता येऊ शकते.  

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

पाणी प्यायल्यानंतर लगेच थोडावेळाने लघवी होणे ही एक सामान्य बाब आहे. पण, काही लोकांना मात्र दर थोड्या वेळाने लघवीला लागते किंवा पाणी पिताक्षणीच लघवीला होते. ही समस्या खूप त्रासदायक ठरू शकते. विशेषतः महिला, वृद्ध व्यक्ती, मधुमेह असलेले किंवा प्रोस्टेटची समस्या असलेल्या पुरुषांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. या समस्येवर तुम्ही सहजपणे मात करू शकता, रोजच्या सवयींमध्ये थोडा बदल केला तर ही समस्या दूर करता येऊ शकते.  

वारंवार लघवी होण्याची समस्या कशी दूर कराल?

पाणी पिण्याची पद्धत सुधारणे: तुम्हाला जर असा त्रास होत असेल, तर सर्वात आधी पाणी पिण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. कमी पाणी पिणे जसे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तसेच एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणेही नुकसानदायक ठरू शकते. दिवसातून सुमारे 1.5 ते 2 लिटर पाणी प्या, पण हळू हळू आणि थोडे थोडे करून प्या. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी 2-3 तास आधी पाणी पिणे कमी करा, जेणेकरून रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणार नाही.

'या' गोष्टी टाळा: काही पदार्थांचे सेवन वारंवार लघवी येण्याची समस्या वाढवू शकते. जसे की कॉफी, चहा, कोल्ड ड्रिंक, दारू, तिखट अन्न, आंबट फळे, टोमॅटो आणि चॉकलेट. असे पदार्थ मूत्राशयाला उत्तेजित करतात. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. जर तुम्ही या गोष्टींचे जास्त सेवन करत असाल, तर काही काळासाठी कमी करा.

पेल्विक मसल्सचा व्यायाम करा: 'कीगल एक्सरसाइज' वारंवार लघवी येण्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. हे पेल्विक फ्लोर स्नायूंना मजबूत करून लघवीवर नियंत्रण वाढवण्यास मदत करते. यासाठी तुम्ही दररोज 5-10 मिनिटे कीगल एक्सरसाइज करू शकता. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

Advertisement

मूत्राशयाला नियंत्रणाची सवय लावणे : मूत्राशयाला नियंत्रणाची सवय लावणे ही एक अशी पद्धत आहे जिथे लघवीला आल्यावर लगेच शौचालयात न जाता, काही काळ थांबण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मूत्राशयाची साठवण क्षमता वाढते. तुम्ही देखील ही युक्ती वापरून पाहू शकता.

वजन कमी करा: जास्त वजन असल्यामुळेही वारंवार लघवी येण्याची समस्या वाढते. विशेषतः पोटाचा दाब मूत्राशयावर पडतो, ज्यामुळे वारंवार लघवी येते. त्यामुळे तुमचे वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी दररोज थोडा वेळ योग, व्यायाम करा किंवा जिना चढण्याची सवय अंगीकारा 

Advertisement

धूम्रपान आणि जास्त मीठ खाणे बंद करा: सिगारेटमधील निकोटीन मूत्राशयाला नुकसान पोहोचवते. तसेच, जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात जास्त पाणी साचून राहते आणि लघवीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे धूम्रपानापासून दूर रहा आणि आहारात मिठाचे सेवन कमी करा.

तणावापासून दूर रहा: या सगळ्या व्यतिरिक्त, जास्त तणाव असल्यामुळेही मूत्राशय वारंवार सक्रिय होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेण्याचे टाळा. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करू शकता.

Advertisement

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुम्ही तुमच्या आहार आणि जीवनशैलीत हे सर्व बदल करूनही कोणताही परिणाम दिसत नसेल, तसेच लघवी करताना जळजळ, खाज सुटणे, रक्त येणे यांसारख्या समस्या होत असतील किंवा तुम्हाला ताप असेल, तर अशा स्थितीत वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.
 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article