
देशात ई-कॉमर्स बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. ॲमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि इतर अनेक मोठ्या कंपन्या देशात आपला व्यवसाय वाढवत आहेत. अहवालानुसार, 2024 मध्ये ई-कॉमर्सचे बाजारमूल्य 125 अब्ज डॉलर्स होते. तर 2022 मध्ये ते 385.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खरेदीदारांची संख्या वाढत असतानाच ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना हे माहित असणे आवश्यक आहे की फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध किंवा अशा प्रकरणांची तक्रार कुठे दाखल करावी.
ग्राहक संरक्षण कायद्यामुळे मिळते ताकद
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 (Consumer Protection Act, 2019) द्वारे ग्राहक आपल्या हक्कांसाठी लढू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यक्तीने एका ऑनलाइन वेबसाइटवरून आयफोन मागवला होता. जेव्हा त्याला त्याची डिलिव्हरी मिळाली तेव्हा आत फोनऐवजी अनेक दगड आढळले. अशा परिस्थितीत, हा कायदा तुम्हाला या फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार देतो.
तक्रारीसाठी काय आवश्यक आहे?
तक्रार दाखल करताना तुमच्याकडे ठोस पुरावे असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे नेहमी व्यवहाराची पावती, ईमेल, उत्पादनाचे फोटो आणि वॉरंटी कार्ड नक्की ठेवा. या सर्व पुराव्यांसह तुम्ही तुमचे प्रकरण अधिक मजबूत करू शकता. त्यातून संबंधीतांवर कारवाई करण्यास बळ मिळते.
ऑनलाइन तक्रार कशी दाखल करावी?
जर एखाद्या विक्रेत्याने उत्पादनासंदर्भात किंवा इतर बाबतीत तुमची फसवणूक केली असेल, तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन/जिल्हा ग्राहक मंचाच्या (National Consumer Helpline/District Consumer Forum) अधिकृत प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. तेथे तक्रार अर्ज भरून, पुरावा म्हणून कागदपत्रे जोडावी लागतील. सोबतच प्रकरणाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
प्रकरणाचे अपडेट्स मिळत राहतील
एकदा तक्रार दाखल झाल्यावर, मंच त्याचे पुनरावलोकन करेल. त्याचबरोबर तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे त्याचे अपडेट्स मिळत राहतील. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या तक्रारीचा लवकर निपटारा व्हावा यासाठी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्वरित द्या. जर मंचाला असे वाटले की विक्रेत्याने तुमची फसवणूक केली आहे, तर तुम्हाला परतावा (refund) आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश दिले जातील.
सायबर गुन्हेगारी पोर्टलचा (Cyber Crime Portal) करा वापर
मंचाव्यतिरिक्त, तुम्ही राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी तक्रार पोर्टल (https://cybercrime.gov.in/) वर देखील तक्रार दाखल करू शकता. याव्यतिरिक्त, सायबर क्राईम सेलमध्ये जाऊन एफआयआर (FIR) देखील दाखल करू शकता. इथेही तुम्हाला नक्की न्याय मिळेल. शिवाय विक्रेत्यावर कडक कारवाई केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world