Red Ants Removal Tips: उन्हाळा सुरू झाला की किचन आणि घरातील सर्वात मोठी त्रासदायक समस्या म्हणजे लाल मुंग्या. एखाद्या पदार्थाला लाल मुंग्या लागल्या की त्या लवकर जाणे मुश्किल होते. या मुंग्या केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूच खराब करत नाहीत, तर त्यांचा दंशही वेदनादायी असतो. अनेक लोक लाल मुंग्या पळवण्यासाठी विषारी कीटकनाशकांचा वापर करतात, जे मुले आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकते. या कीटकनाशकांचा खाण्यापिण्याच्या गोष्टींशी संपर्क आल्यास ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतात. पण केमिकलशिवायच मुंग्यांच्या समस्येतून कायमस्वरुपी सुटका करून घेऊ शकता. हो हे शक्य आहे. चला जाणून घेऊया सोपा आणि प्रभावी उपाय...
लाल मुंग्या पळवण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय
1. व्हिनेगर
किचनमधील व्हिनेगर लाल मुंग्या पळवण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. मुंग्यांना व्हिनेगरचा तीव्र वास सहन होत नाही. मुंग्या चालताना एक विशिष्ट गंध सोडतात, ज्याचा मागोवा घेत इतर मुंग्या त्यांच्या मागे येतात. व्हिनेगर या गंधाला नष्ट करते.
कसा करावा वापर?: एका स्प्रे बॉटलमध्ये अर्धे पाणी आणि अर्धे व्हिनेगर मिसळा. घरात जेथे मुंग्यांचा वावर आहे तेथे हे पाणी शिंपडा.
(नक्की वाचा: Business Idea: घरातल्या अंधाऱ्या खोलीत करा पांढऱ्या सोन्याची शेती, दर महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत येईल कमाई)
2. दालचिनी
दालचिनीचा सुगंध खूप सुंदर आहे, पण लाल मुंग्यांसाठी तो असह्य असतो.
कसा करावा वापर?: दालचिनीची पूड मुंग्यांच्या वारुळाजवळ किंवा त्यांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर शिंपडा किंवा दालचिनीच्या तेलात (Essential oil) कापसाचा बोळा भिजवून तो त्या ठिकाणी ठेवू शकता.
3. लिंबाची साल
जर तुम्हाला व्हिनेगरचा वास आवडत नसेल तर लिंबू हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. लिंबामधील आम्लयुक्त गुणधर्म मुंग्यांचा मार्ग भरकटवण्याचे काम करतात.
कसा करावा वापर?: लिंबाचा रस थेट मुंग्यांच्या मार्गावर शिंपडा किंवा लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे करून किचनच्या कोपऱ्यात ठेवा. त्यांच्या तीव्र आंबट वासामुळे मुंग्या लगेच पळून जातील.
Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)