High Protein Veg Breakfast: तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात का आणि डाएटमध्ये नक्की काय खावं हे समजत नाहीये? असा एखादा पदार्थ जो खाऊन पोटही भरेल, चवही मिळेल आणि प्रोटीनची कमतरताही भरून निघेल? तर ही रेसिपी तुमच्या नक्कीच कामी येऊ शकते. खरं तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की हाय-प्रोटीन डाएट फक्त मांसाहार करणाऱ्यांसाठीच सोपं असतं, पण असं मुळीच नाही. शाकाहारी लोक सुद्धा अतिशय सोप्या मार्गांनी आपल्या डाएटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा समावेश करू शकतात. या लेखाद्वारे आपण व्हेज सँडविचची रेसिपी जाणून घेणार आहोत, जी काही मिनिटांत तयार होते. तुम्ही हे सँडविच ब्रेकफास्ट, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या वेळी सुद्धा सहज तयार करून खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया हे व्हेज सँडविच तयार करण्याची पद्धत...
कसे तयार करावे प्रोटीनयुक्त व्हेज सँडविच (How To Make Protein Rich Sandwich)
साहित्य-
पनीर मॅरिनेशनसाठी
- लो-फॅट पनीर: 40 ग्रॅम
- हळद: चिमूटभर
- लाल तिखट: चवीनुसार
- मीठ: चवीनुसार
- भाजलेली जिरे पूड: अर्धा लहान चमचा
- ताजा लिंबाचा रस
बेसनाचे पीठ (बॅटर)
- बेसन: 1/4 कप
- पाणी: गरजेनुसार
- मसाले: मीठ, हळद आणि जिरे पूड
- हिरवी मिरची: एक ते दोन
- कांदा: 1/4 कप
- कोथिंबीर: बारीक चिरलेली
सँडविच तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- ब्रेड: दोन स्लाइस
- शेंगदाण्याचे तेल: एक ते दोन लहान चमचे
- दह्याची डीप (चटणी): एक ते दोन मोठे चमचे (मखाणे, लाल तिखट, भाजलेले जिरे, फेटलेले घट्ट दही आणि मीठ एकत्र करून बनवलेली)
- अर्धी काकडी
- गाजर स्लाइस
पाहा व्हिडीओ
(नक्की वाचा: Protein Side Effects: हाय प्रोटीन डाएट सुरू करताच पोट बिघडतं? मग 'या' 3 चुका वेळीच थांबवा, नाहीतर...)
कृती-
1. सर्वात आधी 40 ग्रॅम लो-फॅट पनीरच्या तुकड्यावर हळद, लाल तिखट, मीठ, भाजलेली जिरे पूड आणि थोडासा लिंबाचा रस लावून पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या, जेणेकरून मसाले पनीरमध्ये चांगले मुरतील.
2. एका भांड्यात 25 ग्रॅम बेसन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद आणि जिरे पूड घाला. आता थोडे थोडे पाणी घालून घट्टसर बॅटर तयार करा.
3. तव्यावर थोडेसे शेंगदाण्याचे तेल लावा. मॅरीनेट केलेले पनीर बेसनाच्या पिठात चांगले बुडवून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्या.
4. उरलेले बेसनाचे पीठ एकतर ब्रेडला लावून भाजून घ्या किंवा ब्रेडचे स्लाइस तव्यावर हलके कुरकुरीत करून घ्या.
5. ब्रेडच्या एका स्लाइसवर तयार केलेली लो-फॅट ग्रीक योगर्टचे डीप (चटणी) लावा.
6. गाजर आणि काकडीचे पातळ काप ठेवा. आता मधे बेसनमध्ये फ्राय केलेला पनीरचा तुकडा ठेवा आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाकून घ्या.
7. तुमचे हेल्दी सँडविच बनून तयार आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)