Indira Ekadashi Vrat 2025 Date and Puja Vidhi: भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्ष आणि शुक्लपक्षाच्या तिथीला येणाऱ्या एकदशीचे व्रत करण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष तिथीला 'इंदिरा एकादशी' (Indira Ekadashi 2025) साजरी केली जाते. मान्यतेनुसार इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास सर्व पाप नष्ट होतात आणि सर्व सुखांचा आनंद मिळतो तसेच वैकुंठ प्राप्त होते. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या इंदिरा एकादशीचे व्रताची पूजा कशी करावी आणि शुभ मुहूर्त काय आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...
इंदिरा एकादशी व्रताचा शुभ मुहूर्त | Indira Ekadashi 2025 Shubh Muhurat
पंचांगातील माहितीनुसार भाद्रपद महिन्याची एकादशी तिथीस 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.21 (AM) वाजता प्रारंभ होणार असून त्याच रात्री 11.39 वाजेपर्यंत तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार 17 सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी साजरी केली जाईल. तर व्रताचे पारण 18 सप्टेंबर सकाळी 6.07 वाजेपासून ते सकाळी 8.34 वाजेपर्यंत केले जाऊ शकते.
इंदिरा एकादशी पूजा विधी | Indira Ekadashi 2025 Puja Vidhi
- भगवान श्री विष्णू यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी पहाटे उठून स्नान करा.
- व्रताचा संकल्प करावा.
- स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यानंतर सप्त ऋषी आणि पितरांनाही जल अर्पण करावे.
- भगवान विष्णूच्या मूर्तीस किंवा प्रतिमेस पिवळ्या रंगाची फुलं आणि चंदन अर्पण करावे.
- श्री विष्णू यांना पंजिरी, पंचामृत इत्यादी आवडत्या गोष्टींचा नैवेद्य अर्पण करावा.
- धूप-दीप प्रज्वलित करुन इंदिरा एकादशीचे व्रत करावे.
- श्री हरींची आरती करावी.
- भगवान विष्णूंचा हा व्रत विधीवत करण्यासाठी दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर पारण करावे.
इंदिरा एकादशीची व्रताची कथा
भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनास इंदिरा एकादशी कथा सांगून त्याचे महत्त्व सांगितले होते. पौराणिक कथेनुसार सतयुगामध्ये राजा इंद्रसेनचे महिष्मती नावाच्या नगरीवर राज्य होते. इंद्रसेन धर्मनिष्ठ राजा होता. एकेदिवशी नारद मुनी त्यांच्याकडे आले आणि सांगितले की, हे राजा एकादशी व्रत मोडल्याच्या पापामुळे तुमचे वडील यमलोकात आहे. जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत विधीवत केले तर त्याचे पुण्य लाभेल आणि वडिलांची मुक्तता होईल. यानंतर नारद मुनींनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत इंद्रसेनने व्रत केले आणि त्यांच्या वडिलांना वैकुंठ लोक प्राप्त झाले.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)