Success Story: लग्न झालं, बाळं झाले की मग कसले शिक्षण आणि करिअर ही चर्चा तुम्ही अनेकदा ऐकली असेल. विशेषत: महिलांच्याबाबतीत ही चर्चा अनेकदा केली जाते. पण, या प्रत्येक परिस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणींंवर मात करत यश मिळवता येतं, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे.
मध्य प्रदेशच्या वर्षा पटेल यांनी देखील याच प्रकारचा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये झगडून मोठं यश मिळवलंय. त्यांनी एमपी पीसीएस (MP PCS Result) मध्ये थेट पहिला क्रमांक पटावला असून त्या आता डीएसपी (DSP) बनल्या आहेत. . हे यश आणखी खास आहे, कारण त्यांनी कुटुंब आणि बाळाला सांभाळून हे साध्य केले. एवढेच नाही, तर त्यांनी त्यांच्या 20 दिवसांच्या मुलीला कडेवर घेऊन ही मुलाखत दिली.
वडिलांचे निधन झाले तरीही....
मध्य प्रदेश लोक सेवा आयोगाचा (MPPSC) निकाल 12 सप्टेंबर रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत वर्षा यांनी अव्वल क्रमांक पटाकवला आहे. पण त्यांची कहाणी ऐकून तुमचे डोळे पाणावू शकतात. वर्षा यांना लहानपणापासूनच एक अधिकारी व्हायचे होते. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांच्या वडिलांचे निधन लवकर झाले त्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरुच ठेवले.
( नक्की वाचा : Jwala Gutta: प्रेरणादायी! बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केले 30 लीटर ब्रेस्ट मिल्क दान, कारण समजल्यावर कराल सलाम )
20 दिवसांच्या मुलीला घेऊन मुलाखतीला पोहोचल्या
वर्षा यांचे लग्न हे काही दिवसांनी संजय पटेल यांच्याशी झाले. संजय वाराणसीमध्ये एका व्यवस्थापकीय पदावर काम करतात. संजय यांनी पत्नीला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण साथ दिली.
याआधीही त्यांनी अनेक वेळा परीक्षा दिली होती, पण त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. या काळात त्या गर्भवती झाल्या, तरीही त्यांनी आपला अभ्यास आणि तयारी थांबवली नाही. 22 जुलै 2025 रोजी त्यांनी सी-सेक्शन शस्त्रक्रियेद्वारे मुलगी श्रीजाला जन्म दिला. 26 दिवसांनंतर त्यांची मुलाखत होती. त्यांच्या जखमा पूर्णपणे भरल्या नव्हत्या, तरीही त्या नवजात मुलीला घेऊन पतीसोबत मुलाखतीला पोहोचल्या.
निकाल लागल्यावर वर्षा यांची DSP पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी महिला वर्गात पहिले स्थान पटकावले. कुटुंबाची आणि मुलाची जबाबदारी असल्यामुळे काहीही करू शकत नाही, असे मानणाऱ्या लोकांसाठी वर्षा यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे. या प्रवासात त्यांच्या पतीने त्यांना पूर्ण साथ दिली. योग्य जीवनसाथीची साथ असते आणि मेहनत करण्याची जिद्द असते, तेव्हा काहीही अशक्य नसते, हेच वर्षा यांनी दाखवून दिले.