आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा अनियमित झाल्या असून मानसिक ताण देखील वाढत चालला आहे. अपुरी झोप आणि दीर्घकालीन तणावाचा थेट परिणाम हा हृदयाच्या आरोग्यावर होतो. केळ आहाराच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव नाही तर तणाव आणि अपुरी झोप हे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. वेळीच काळजी आणि जीवनशैलीतील बदल करुन गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
नक्की वाचा: स्लीप टुरिझम म्हणजे काय? शांत झोप मिळवण्यासाठी लोक का करतायेत प्रवास, काय आहे ट्रेंड?
पुरेशी झोप का गरजेची आहे?
हृदयाच्या स्नायूंचे आरोग्य बहुतेकदा केवळ आहार, व्यायाम आणि जीवनशैलीच्या सवयींशी जोडले जाते, परंतु दीर्घकालीन तणाव आणि झोपेचा अभाव हृदयासाठी तितकाच हानिकारक ठरतो आहे. दीर्घकाळापर्यंत ताण आणि निद्रानाश हे शारीरिक संतुलन बिघडवतात, रक्तदाबाची समस्या , हार्मोनल बदलांना कारणीभूत ठरतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि जीवघेणी गुंतागुंत टाळण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राखणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
सध्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. हृदयाच्या समस्या या चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे उद्भवतात. याव्यतिरिक्त तणाव, अपुरी झोप, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनुवांशिक घटक देखील यास कारणीभूत ठरतात. तणावामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. कालांतराने यामुळे उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. छातीत दुखणे, धडधडणे, चिडचिड आणि थकवा ही लक्षणे दिसून येतात. शिवाय, झोपेची गुणवत्ता खालावणे हे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाशी जोडले जाते. दीर्घकाळापर्यंत झोप न येणे हे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते आणि हार्ट फेल्युअरची शक्यता वाढवू शकते ,असे नवी मुंबईतील वाशी येथील न्यूईरा हॉस्पिटलचे कार्डिओलॉजीस्ट डॉ. गौरव सुराणा यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा: अंथरुणावर पडताच 5 मिनिटात झोप येईल, Harvard च्या डॉक्टरांनी सांगितला गाढ झोपेचा सोपा उपाय
कोणाला किती झोप गरजेची आहे ?
डॉ. गौरव सुराणा पुढे सांगतात की, वाढता तणाव आणि अपुरी झोप हे हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात. झोप ही शरीराची नैसर्गिक दुरुस्तीची एक योग्य वेळ मानली जाते. योग्य विश्रांतीशिवाय, हृदय जास्त वेळ काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अगदी हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. हृदयाच्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाइतकेच ताणतणावाचे व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे. नियमित ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणे, झोपेचे वेळापत्रक पाळणे, झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन किंवा गॅझेट्सचा वापर टाळून निद्रानाश किंवा तणावासाठी वैद्यकीय मदत घेऊन घातक हृदयरोग टाळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते 18 ते 64 वयोगटातील प्रौढांसाठी 7-9 तासांची झोप आणि 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकसंख्येसाठी 7 ते 8 तासांची झोप गरजेची आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयाचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, तणावमुक्त जीवनशैली जगणे आणि चांगल्या झोपेच्या सवयीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.