कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल-डिझेल दिवसा भरावं की रात्री असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. मात्र वाहनांमध्ये इंधन सकाळी भरावं की रात्री आणि याचे फायदे-तोटे यामागे काही वैज्ञानिक कारणे लपली आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात पेट्रोल भरू नका, रात्री किंवा पहाटे भरा म्हणजे जास्त पेट्रोल मिळेल, असा सल्ला तुम्हालाही कधी ना कधी मिळाला असेल. इंधनाची घनता (Density) आणि तापमान यांचा संबंध असल्याने हा तर्क लढवला जातो. पण खरंच भारतीय पेट्रोल पंपांवर असे घडते का? याची सविस्तर माहिती घेऊयात.
चर्चेचे मूळ कारण थर्मोडायनॅमिक्स
हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. विज्ञानानुसार, द्रव पदार्थ गरम झाल्यावर प्रसरण पावतात आणि थंड झाल्यावर आकुंचन पावतात. पेट्रोलचेही तसेच आहे. तापमानात वाढ झाली, तर पेट्रोलची घनता साधारणपणे कमी होते. सिद्धांतानुसार, थंड पेट्रोलची घनता जास्त असल्याने एका लिटरमध्ये थोडे जास्त ऊर्जा देणारे घटक असू शकतात.
जमिनीखालील टाक्यांचे संरक्षण
भारतातील बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधन हे जमिनीखालील टाक्यांमध्ये साठवले जाते. मातीमुळे या टाक्यांचे नैसर्गिकरित्या इन्सुलेशन (Insulation) होते. त्यामुळे दुपारचे तापमान असले तरी, जमिनीखालील इंधनाचे तापमान स्थिर राहते. अभ्यासानुसार, या टाक्यांमधील तापमानात दिवसभरात पेक्षाही कमी बदल होतो. परिणामी, तुम्ही दुपारी 2 वाजता पेट्रोल भरा किंवा रात्री 2 वाजता, इंधनाच्या तापमानात आणि घनतेत कोणताही मोठा फरक पडत नाही.
बाष्पीभवन आणि आधुनिक नोझल्स
उन्हात पेट्रोलचे बाष्पीभवन जास्त होते, असाही एक समज आहे. मात्र, भारतातील आधुनिक पंपांवर आता 'सील्ड नोझल्स' आणि 'व्हेपर रिकव्हरी सिस्टम' वापरली जाते. यामुळे इंधन भरताना वाफेच्या स्वरूपात होणारे नुकसान अत्यंत नगण्य असते. त्यामुळे दिवसा इंधन भरल्याने तुमचे नुकसान होते, हे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे.
पंपांचे नियम
ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) नियमानुसार पंपांचे नियमित 'कॅलिब्रेशन' करतात. मशीनवर दिसणारे प्रमाण आणि प्रत्यक्ष मिळणारे इंधन यात तफावत राहू नये, याची कायदेशीर काळजी घेतली जाते. त्यामुळे दिवसा किंवा रात्री, इंधन देण्याच्या प्रमाणात कोणताही फरक पडत नाही.
रात्री पेट्रोल भरण्याचा एकमेव व्यावहारिक फायदा
तापमानामुळे इंधनाची बचत होत नसली, तरी रात्री किंवा पहाटे पेट्रोल भरण्याचा एक मोठा फायदा म्हणजे 'वाहतूक कोंडी'. गर्दीच्या वेळी पंपावर लागणाऱ्या लांब रांगा टाळण्यासाठी आणि आपला वेळ वाचवण्यासाठी रात्री इंधन भरणे सोयीचे ठरू शकते. याव्यतिरिक्त, दिवसाच्या तुलनेत रात्री इंधन जास्त मिळते, या दाव्यात कोणतेही ठोस तथ्य नाही.