Janmashtami 2025 Date And Time: "वासुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम।।" श्रावण वद्य अष्टमी तिथीस मध्यरात्री श्री कृष्णाचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस 'कृष्णजयंती', 'जन्माष्टमी' (Janmashtami 2025) किंवा 'गोकुळाष्टमी' (Gokulashtami 2025) या नावांनी ओळखला जातो. श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. दरवर्षी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा कंसाच्या बंदीशाळेत जन्म झाला होता. देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भरपावसात यमुना नदीतून प्रवास करत बाळकृष्णाला गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले. वर्षानुवर्षे या दिवशी देशभरात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त उपवास, पूजाविधी करून जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा गोकुळाष्टमी कधी आहे, तिथी कालावधी, शुभ मुहूर्त, पूजा, आरती यासह सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...
जन्माष्टमी कधी आहे, 15 ऑगस्ट की 16 ऑगस्ट रोजी? (When Is Janmashtami 2025)
पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण सप्तमी तिथी उशीरा रात्री 12.55 (AM) वाजेपर्यंत आहे. जन्माष्टमीसाठी अष्टमी निशिथयोगिनी घ्यावी असे शास्त्र आहे. 15 ऑगस्टला पुण्यासाठी निशिथकाळ उशीरा रात्री 12.15 (AM) वाजेपासून ते रात्रौ 1 वाजेपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी अष्टमी तिथी निशिथ काळापूर्वीच समाप्त होते. त्यामुळे 'पूर्वेद्युरेव निशीथयोगे कर्मकालव्याप्तेस्तत्रैव सत्वात्पूर्वैव' या धर्मशास्त्र वचनानुसार 15 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये निशीथकाळात अष्टमीचा योग असल्याने 15 तारखेस जन्माष्टमी करणे शास्त्रसंमत आहे. ज्या गावी 15 आणि 16 ऑगस्ट दोन्हीही दिवशी निशीथकाळात अष्टमीचा योग नाही अशा ठिकाणी 'उभयेद्युः निशीथयोगाभावे परैव ।' या वचनानुसार 16 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करावी.
श्रीकृष्ण जयंतीची अष्टमी तिथी 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता समाप्त होत आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी जन्माष्टमी साजरी करावी? वाचा माहिती
15 ऑगस्टला या ठिकाणी असेल जन्माष्टमी
पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोकर्ण, धुळे, जळगाव, भुसावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अलिबाग, गोवा, विजयपुरा, बेळगाव, हुबळी, धारवाड, वडोदरा, सुरत, अहमदाबाद, जोधपूर, उदयपूर, बीकानेर, रतलाम
16 ऑगस्टला या ठिकाणी असेल जन्माष्टमी
अकोला, अमरावती, बीड, नागपुर, सोलापूर, धाराशिव, जालना, उज्जैन, इंदोर, भोपाळ, जबलपूर, बिदर, अक्कलकोट, गाणगापूर, नांदेड, भुसावळ, निझामाबाद, परभणी, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, लातूर, हैदराबाद, गोंदिया, बेंगलोर, भंडारा, चंद्रपूर, संपूर्ण उत्तर प्रदेश, तेलंगाणा, आंध्र प्रदेश
(नक्की वाचा: Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या पूजेचा महाउपाय, श्रीकृष्णाचा मिळेल मोठा आशीर्वाद)
जन्माष्टमी पूजेसाठी लागणारे साहित्य (Janmashtami 2025 Puja Sahitya)
- हळद, कुंकू, गंध, शेंदूर, अक्षता
- उदबत्ती, वाती, कापूर, रांगोळी, कलश, पंचपात्री
- पळी, ताम्हण, समई, निरांजन, पंचारती, घंटा, कापसाचे वस्त्र
- दोन नारळ, दोन सुपाऱ्या, चार विड्याची पाने, पाच प्रकारची फळे किंवा पाच केळी
- सुटी नाणी, एक वाटी गूळ-खोबरे, फुले, हार, पाट, तुळस, दुर्वा, बेल, तेल, तूप
- श्रीकृष्णाला अपर्ण करण्यासाठी नैवेद्य (गोड पदार्थ)
जन्माष्टमी पूजा कशी करावी? (Janmashtami 2025 Puja Vidhi)
- पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी.
- चौरंगावर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे.
- चौरंगावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
- पंचामृताने भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करावा.
- यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्तीला स्नान घालावे.
- बाळकृष्णाच्या मूर्तीस रेशीम वस्त्र परिधान करावे.
- चंदन, हळद-कुंकू, मोरपंख, मुकूट, बासरी, दागिन्यांनी मूर्ती सजवावी.
- श्रीकृष्णांच्या आवडत्या पदार्थांसह फळांचा नैवेद्य अपर्ण करावा.
- नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानाचा समावेश करावा.
- धूप, दीप प्रज्वलित करून देवाची आरती करावी.
- मध्यरात्री बरोबर 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा.
- पूजा पठण करुन प्रसादाचे वाटप करावे.
जन्माष्टमीला सुंठवड्याचा प्रसाद वाटण्याची परंपरा आहे, जाणून घेऊया सुंठवड्याची रेसिपी
सुंठवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
- 1 इंच सुंठ
- 3 चमचे खडी साखर
- 1-2 वेलदोडे
- 4-5 खारीक
- 10-12 बदाम
- 10-12 काजू
- 10-12 पिस्ता
- 1 चमचा पांढरे तीळ
- 1 चमचा खसखस
- 1 चमचा बडीशेप
- सुके खोबरे
वरील सर्व सामग्री पॅनमध्ये खरपूस भाजून घ्या.
साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
सुंठवडा रेसिपी व्हिडीओ
जन्माष्टमीचा उपवास कसा करावा?- निर्जळी किंवा फलाहार करूनही उपवास करू शकता.
- मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केल्यानंतर उपवास सोडावा.
- काहीजण या दिवशी दुधाच्या पदार्थांचे सेवन करत नाहीत.
- सात्विक आहाराचे सेवन करून उपवास करावा.
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ।। धृ० ।।
ज्याचे अति सुकुमार। ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर || ओ० ||1 ||
नाभिकमली ज्याचे ब्रह्मयाचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन || ओ० || 2 ||
मुखकमल पाहता सूर्याच्या कोटी। मोहियेले मानस हारपली दृष्टी ।। ओ० ॥3॥
जडितमुगुट ज्याचा देदीप्यमान । तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओ० ॥4 ||
एका जनार्दनी देखियले रूप। रूप पाहो जाता झाले तद्रूप । ओवाळू आरती मदनगोपाळा ।।5।।
अवतार गोकुळी हो। जन तारावयासी । लावण्यरूपडे हो । तेजःपुंजाळ राशी । उगवले श्री श्री कोटिबिंब ।
रवि लोपले शशि । उत्साह सुरवरां । महाथोर मानसी ।।1।। जय देवा कृष्णनाथा|
रखुमाई कांता । आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसूता ।। धृ० ।।
कौतुक पहावया । माव ब्रह्मयाने केली । वत्सेही चोरोनिया ।सत्य लोकासी नेली । गोपाळ गाई वत्से।
दोही ठाई रक्षिली। सुखाचा प्रेमसिंधु । अनाथाची माउली ।।2।।
चारिता गोधने हो । इंद्र कोपला भारी। मेघ जो कडाडीला । शिळा वर्षल्या धारी। रक्षिले गोकुळ हो।
नखी धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरला हरी ||3||
वसुदेव देवकीचे बंदी फोडिली शाळा । होऊनिया विश्वजनिता । तया पोटीचा बाळ । दैत्य हे त्रासियेले ।
समूळ कंसासी। काळ राज्य हे उग्रसेना । केला मथुरापाळ ।।4।।
तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून । पांडवां साहाकारी। अडलिया निर्वाणी। गुण मी काय वर्णूं। मति केवढी वानू ।
विनवितो दास तुका। ठाव मागे चरणी। जय देवा कृष्णनाथा ।।5।
(नक्की वाचा: Shravan 2025 Wishes In Marathi: भक्तीचा उत्सव फुलला, श्रावण मास आला! श्रावण मासारंभाच्या पाठवा खास शुभेच्छा)
श्रीकृष्णाचा पाळा (Shri Krishanacha Palna)पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ, कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे, गोरसं रंग जसा झळकतो आरशाचा भिंग ॥2॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायांनो उठा, खारीक खोबरं साखर वाटा ॥3॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
चौथ्या दिवशी बोलली बाळी, अनुसयेने वाजविली टाळी, कृष्ण जन्मला यमुना तळी ॥4॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा, लिंबू नारळ देवीला फोडा, तान्ह्या बाळाची दृष्ट गं काढा ॥5॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
सहाव्या दिवशी कलीचा मारा, राधा कृष्णाला घालते वारा, चला यशोदा आपुल्या घरा ॥6॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
सातव्या दिवशी सटवीचा महाल, तेथे सोनेरी मंडप लाल, यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले ॥7॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
आठव्या दिवशी आठवीचा थाट, भूलल्या गवळणी तीनशेसाठ, श्रीकृष्णाची पाहतात वाट ॥8॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
नवव्या दिवशी नवतीचा फंद, तान्ह्या बाळाने घेतला छंद, वासुदेवाचा सोडवावा बंध ॥9॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
दहाव्या दिवशी भाग्येची रात, तेहतीस कोटी देव मिळुनी येती, उतरून टाकती माणिक मोती ॥10॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
मथुरा नगरीत देवकीचे हाल ॥11॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
बाराव्या दिवशी बाराच नारी, पाळणा बांधिला यशोदा घरी, त्याला लावली रेशमी दोरी ॥12॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
तेराव्या दिवशी बोलली बाळी, श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी, गवळणी संगे लावितो खळी ॥13॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
चौदाव्या दिवशी तोफा गर्जती, शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती ॥14॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
पंधराव्या दिवशी नौबत वाजे, श्रीकृष्णावरती घातला साज, यशोदा मातेला आनंद आज ॥15॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरू महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गायीला जो बाळा जो जो रे जो॥16॥
जो बाळा जो जो रे जो॥धृ॥
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)